**समन्वय समिती अध्यक्ष प्रांताधिकारी शिंगटे यांची मिरज सुधार समितीला माहिती
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी प्रशासन पातळीवर हालचाली गतिमान झाले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. पुढील आठवड्यात रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे समन्वय समिती अध्यक्ष प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मिरज शहर सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता करण्यावरून प्राधिकरण, महापालिका, महावितरण कंपनी हे जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलत असल्याने मिरज शहर सुधार समितीने आमरण उपोषण आंदोलन केले. समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याची सुचना केल्याने समिती गठन करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी समीर शिंगटे, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता संतोष रोकडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्याअधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत रस्ता करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर चर्चा झाली. पुढील आठवड्यापासून काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मिरज शहर सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, असिफ निपणीकर, जहिर मुजावर, शकील पीरजादे, अनिकेत माने, मुस्तफा रोहिले आदी सदस्य उपस्थित होते.