रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नुकताच कायदे विषयक समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुमसर वकील संघाचे अध्यक्ष अँड दीपक रावलानी हे उपास्थित होते. यावेळी माहिती अधिकाराचे विषयी अॅड. रावलानी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "माहितीचा अधिकार हा भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या अधिकाराची नांदी आहे. माहिती अधिकाराच्या सकारात्मक वापरातून देशातील अनेक समस्यांचे निराकरण करणे शक्य आहे."
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मसराम म्हणाले की, "माहितीच्या अधिकारामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच शासकीय व्यवस्थेवर सुद्धा नैतिक नियंत्रण निर्माण झाले आहे. त्यामुळे या अधिकाराचा वापर नागरिकांनी जपून करायला हवा. " महाविद्यालयातील समान संधी केंद्राद्वारे सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात. समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, महिला, अल्पसंख्याक समूह अशा अनेक वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हे कार्यक्रम घेतले जातात.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील डॉ. गोल्डी बघमार, डॉ. सचिन वेरूळकर श्री. गजानन वरकडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आर. के. दिपटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुनीता राठोड यांनी केले तर प्रा. अमोल खांदवे यांनी आभार मानले. समान संधी केंद्राचे समन्वयक डॉ. जे. व्ही. गडपायले यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.