कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘काजवा महोत्सवा’साठी नवी नियमावली; मात्र अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 24/05/2026 1:08 PM


अहिल्यानगर : कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात दरवर्षी होणाऱ्या ‘काजवा महोत्सवा’मुळे पर्यावरण आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा पर्यावरण संवेदनशील समितीने कठोर नियमावली जाहीर केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार काजव्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांची नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. रात्री ९ नंतर वाहनांना प्रवेशबंदी असेल, तर रात्री १० नंतर काजवा क्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गर्दी नियंत्रणासाठी पर्यटकांच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र गेटची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार हा महोत्सव आता दरवर्षी न घेता दोन वर्षातून एकदाच आयोजित करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाकडून अभयारण्य क्षेत्रात कडक नियंत्रण ठेवले जाणार असून पर्यटकांना फटाके नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटकांकडून बाटलीमागे १०० रुपयांची अनामत रक्कम घेतली जाते. बाटली परत केल्यानंतर ही रक्कम परत दिली जाते. तसेच प्रत्येक पर्यटकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात याचिकाकर्ते व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “ऑनलाइन बुकिंगशिवाय कोणालाही अभयारण्यात प्रवेश देऊ नये, स्वतंत्र प्रवेशद्वाराची अंमलबजावणी व्हावी आणि महोत्सव दर दोन वर्षांनीच आयोजित करावा, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही सूर्यास्तानंतर पर्यटकांना प्रवेश का दिला जातो?” असा सवाल त्यांनी केला.
स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “स्थानिकांना रोजगार मिळावा हे योग्य असले तरी प्रत्यक्षात काही बाहेरील व्यावसायिक टेंट उभारून आर्थिक फायदा घेतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊनही स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळत नाही.”
दरम्यान, नवीन नियमावली जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#KalsubaiHarishchandragad
#KajwaMahotsav
#FireflyFestival
#अहिल्यानगर
#कळसुबाईहरिश्चंद्रगड
#पर्यावरण
#वनविभाग
#NGT
#GaneshBorhade
#EcoSensitiveZone
#WildlifeProtection
#Maharashtra
#Fireflies
#Tourism
#EnvironmentalProtection
#काजवामहोत्सव
#पर्यटन
#महाराष्ट्रन्यूज
#AhmednagarNews
#BreakingNews

Share

Other News

ताज्या बातम्या