' शरद पवार ' व्हायची जयंत पाटील यांची संधी हुकली?. : सतिश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2024 11:16 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे स्थान काय आहे. याबद्दल फारसा पंक्तीप्रपंच करण्याची गरज नाही. श्री पवार यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन दिग्गजांच्या राजकारणातील महत्तम विचार एकत्र करून गेल्या पाच दशकांचे महाराष्ट्रातील राजकारण उभे केले आहे. आता श्री पवार त्यांच्या आयुष्यातील शेवटची इंनिंग खेळत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात त्यांची जागा कोण घेऊ शकेल असं खात्रीने एकही नाव पुढे येत नाही. श्री पवार यांनी नव्या नेतृत्वासाठी सतत भाकरी फिरवत ठेवली आहे. अशावेळी त्यांच्या पक्षातील जयंत पाटील यांचे नाव पुढे येत असताना त्याला त्यांनी स्वतःच खोडा घातला आहे. सांगली लोकसभेच्या जागेचा जो काही खेळखंडोबा झाला आहे; त्यात आपला सहभाग नाही असा जयंत पाटील यांनी वारंवार खुलासा केला आहे. खरं तर अशा राजकीय गमजा केल्यानंतर असा खुलासा करायची जयंत पाटील यांची कधीही सवय नाही. तरीही ते असा खुलासा का बरे करीत असतील? अशाच गमजा श्री पवार यांनी अनेकदा केल्या आहेत. त्याबाबतीत त्यांचे पवारांशी साम्य आहे. मात्र त्याचवेळी संधी मिळेल तेव्हा वैरभाव विसरून पारंपरिक विरोधकांच्या मागे बळ उभे करण्याची ची लवचिकता किंवा कसब जे पवारांच्या ठायी आहे ते जयंतरावांच्या ठायी नाही. त्यामुळेच पवारांचे राजकारण खुनसी आहे असं कोणीही म्हणत नाही. पवारांना स्वकीयांपेक्षा विरोधी पक्षात जास्त मित्र असतात असंही म्हटलं जातं. मात्र हे मैत्र निरपेक्षपणे निभावण्याचा दिलदारपणा त्यांच्याकडे आहे.  ते कसब पवारांप्रमाणे विरोधकात मैत्र शोधणाऱ्या जयंत पाटील यांच्याकडे मात्र नाही. आज बारामतीत चोहोबाजूनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाही पवार थोपटे, तावरे, इंदापूरचे पाटील यांना हाताशी धरत नव्याने उभे राहू शकतात यामागे त्यांचे हेच कसब आहे. सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील यांनी केल्या तीस वर्षात केलेल्या राजकीय गमजा सर्वज्ञात आहेत. अशा सतत गमजा केल्याने जेव्हा केव्हा आपली गमजा होते तेव्हा सोबत करायला कोणी सोबत असत नाहीत. जयंत पाटील यांच्याबाबत आता अशी वेळ आली आहे. महाराष्ट्राचे राजकारण १८० कोनात बदलत असताना सांगलीच्या राजकारणात असा बदल करण्याचे कसब मात्र जयंत पाटील दाखवू शकले नाहीत. विशाल पाटील जिंकतील की हरतील हा प्रश्‍न तुर्त बाजूला ठेवुया. मात्र जयंत पाटील यांनी जिल्ह्यात भाजपचे राजकारण पोसताना काँग्रेसचे खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात आता राष्ट्रवादीचेही खच्चीकरण केले आहे. त्यामुळे आता त्यांना भविष्यात स्वतःलाच भाजपमध्ये जायची वेळ येणार आहे. कारण आता भाजपला जयंत पाटील यांची पुर्वीइतकी गरज उरलेली नाही. गरजच तपासायची झाल्यास येत्या काळात  जयंत पाटील यांना भाजपची गरज भासेल. वसंतदादा आणि राजारामबापू यांचा जिल्ह्यातील राजकीय संघर्ष विधायक राजकारणातून होता. मुद्यांचा संघर्ष होता. बापूंच्या पश्‍चात दादांनी जयंतरावांना बोट धरून काँग्रेसमध्ये आणले. म्हणूनत ते वसंतदादा ठरतात. त्याच दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप असलेल्या शरद पवार यांनाही दादांनी मोठ्या मनाने माफ करीत आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पवारांच्या पाठीशी रहा असा संदेश शेवटच्या काळात दिला होता. दादांचे हे निर्णय राजकारणातील तडजोड नव्हे तर त्यांच्या व्यापक बेरजेच्या राजकारणाचा भाग होते. पवारांनीही तेच राजकारण पुढे नेले. या कसोट्यांवर जयंत पाटील यांचे राजकारण तपासले तर अशी व्यापकता त्यांच्या राजकारणात दिसते का? पवार होण्यासाठीचे अनेक गुण जयंतरावांच्या ठायी असूनही व्यापक राजकारण करण्याचा गुण त्यांच्याकडे नाही हे वारंवार अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राचे पुढचे शरद पवार व्हायची संधी गमावत आहेत. किंबहुना पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात यांनी आर आर पाटील यांना पुढे चाल देताना उपमुख्यमंत्रीपदी का निवड केली असावी हेही त्यातून दिसून येते.
असो आज महाविकास आघाडीच्या राज्याच्या जागावाटपात जयंत पाटील यांचे स्थान काय होते हे वेगळे सांगायची गरज नाही. अशावेळी त्यांना त्यांच्या गृहजिल्हा सांगली लोकसभेच्या जागावाटपापासून शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांनी दूर ठेवले गेले असेल असं त्यांचे सांगणे म्हणजे एक विनोदच. आज भाजपविरोधात खुद्द श्री पवार आपले सर्व राजकीय कसब पणाला लावून एल्गार करीत असताना सांगलीत भाजपचा पराभव कोण करू शकेल हे जयंतरावांना समजले नसेल का?  की समजलं तरी समजून घ्यायचं नसेल? वसंतदादांनी जो समजूतदारपणा दाखवत जयंतरावांना बोट धरून जसं काँग्रेसमध्ये आणलं तसं व्यापक राजकारण जयंतरावांना या क्षणी करता आले नसते का? जसा शरद पवारांनी राज्यातील आपल्या अनेक पारंपरिक विरोधकांना सोबत घेत जे व्यापक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. अगदी  राष्ट्रवादीच्या खच्चीकरणासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्य बँकेच्या चौकशीचा निर्णय करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही श्री पवार यांनी ताज्या घडामोडीत निर्णायक क्षणी साताऱ्यातून स्वपक्षाची उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला होता. असं व्यापक राजकारण करणं म्हणजे शरद पवार  असणं असतं. सांगलीच्या राजकारणाबाबत जयंत पाटील यांनी या निर्णायक क्षणी दाखवलेला कोतेपणा त्यांच्या राजकारणाचा पट आणखी संकुचित करणारा ठरला आहे. जो त्यांची महाराष्ट्राचे पुढचे शरद पवार व्हायची संधी घालवणारा ठरला आहे. ज्या काँग्रेसविरोधात पवारांनी आयुष्यभर विरोधाचे राजकारण करूनही सोनिया गांधी, खर्गेपर्यंतचे नेते पवारांसोबत पुन्हा राजकीय चर्चेला बसतात. विश्‍वास दाखवतात. असा विश्‍वास जयंत पाटील यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून मिळू शकतो का? सांगलीच्या जागेबाबत जयंत पाटील यांनी केलेली चाल ही जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला  नवीन दिशा देणारी ठरेल का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे......

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या