स्वाभिमानी शेतकरी संघटना माढ्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार?

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 22/04/2024 9:18 AM

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

राजू शेट्टी सांगतील त्याच काम करणार. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भूमिका


दहिवडी : दि.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि  प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे माण आणि खटाव तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्व तालुक्यात स्वाभिमानीचे जाळे आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिकाही याबाबत महत्वाची ठरणार आहे.
सध्या माण आणि खटाव तालुक्यात शेतकरी संघटनेच्या ६०हून अधिक शाखा आहेत. माण तालुक्यात राजू मुळीक यांनी आपले संघटन मजबुत केले आहे, तर खटाव तालुक्यात स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनीही स्वाभिमानी भक्कम केली आहे.
काही दिवसांपूर्वी वडूज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला माढा लोकसभा मतदार संघातून मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यावर स्वाभिमानी कुणाला पाठिंबा देणार, याबाबतचा निर्णय सोपवला असून ते सांगतील त्या पक्षाला पाठिंबा दिला जाईल, असा एकमुखी निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. 
राजु शेट्टी यांचा महायुतीकडून विचार करण्यात आला नाही तर महाविकास आघाडीकडून ही राजू शेट्टींना फारसे विचारात घेतले गेले नाही, म्हणून  राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीचा नाद सोडून देत 'एकला चलो रे' अशी भूमिका घेतली आहे. 
त्यामुळे माढ्याच्या लढाईत ते आपल्या कार्यकर्त्यांना कुणाला पाठिंबा देण्याचा आदेश देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चौकट : ०१)
स्वाभिमानीला आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव- माणमध्ये विजेचे प्रश्न, उसाची यशस्वी दरवाढ, आले पिकाचे आंदोलन, तालुक्यातील विविध प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानीबाबत खटाव माणमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण तयार झाले आहे. त्या आकर्षणापोटीच स्वाभिमानी आपल्या सोबत असावी, असा प्रयत्न लोकसभा लढणाऱ्या उमेदवारांचा आहे. स्वाभिमानी आपल्याकडे वळवण्यामध्ये सगळ्याच राज्यकर्त्यांचा प्रयत्न दिसतो आहे.
चौकट : ०२)
स्वरूप जानकर आणि धैर्यशील मोहिते राजू शेट्टींच्या संपर्कात?
परभणीतून महायुतीचे वर्चस्व मान्य करत मैदानात उतरलेल्या महादेव जानकर यांचे पुतणे असलेल्या स्वरूप जानकर यांनी बहुजन समाज पार्टीच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार स्वाभिमानीचा पाठिंबा मिळावा म्हणून ते राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हेही राजू शेट्टी यांच्याशी पाठींबा मिळावा म्हणून संपर्क साधत आहेत, असे सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे माढ्याच्या गाड्याचा कासरा नेमका कुणाला द्यायचा? याबाबत राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार? आपला पाठिंबा कुणाला देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या