व्यासंगी व विद्यार्थ्याना न्याय देणारे शिक्षक हे समाजाचे भूषणच, मुख्याध्यापक सुनिल पाटील यांच्या सेवानिवृती कार्यक्रमात शाळा समिती चेअरमन अनिता पाटील यांचे प्रतिपादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 6:17 PM


व्यासंगी आणि विद्यार्थ्यांना न्याय देणारे शिक्षक हे दुर्मिळ होत चालले असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भिस्त ठेवावी असे क्षमताधिष्ठित शिक्षक हे समाजाचे देखील भूषणच आहेत, असे प्रतिपादन लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य आणि श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळा समितीच्या चेअरमन श्रीमती अनिता पाटील यांनी केले. निमित्त होते श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सुनील दरगोंडा पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे !
शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर आर् ओ सिस्टीम कार्यान्वित केल्यानंतर लवकरच  शाळेच्या क्रीडांगणाभोवती सुरक्षा भिंतीचे काम देखील निश्चितच पूर्ण केले जाईल - असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सेवानिवृत्ती सोहळ्याच्या प्रारंभी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करून शाळेचे मा पर्यवेक्षक श्री अनिलकुमार कुदळे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सत्कारमूर्ती श्री पाटील सरांच्या महाविद्यालयीन जीवनातील काही मार्मिक घटना सांगून सरांच्या सरळ- सोज्वळ स्वभावाची महती सांगितली. 

यानंतर मंचासीन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती श्री सुनील दरगोंडा पाटील तसेच सौ सुजाता पाटील या उभयतांचा साडी, ओटीसाहित्य, शाल-श्रीफळ , बुके तसेच श्री १००८ भगवान पार्श्वनाथांची चांदीची प्रतिमा, दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला तसेच  मंचासीन सर्वच मान्यवरांचा स्वागतपर सन्मान करण्यात आला.

यावेळी सरांच्या सहकारी सौ राजश्री पेटारे, श्री महेश जायाप्पा व ग्रंथपाल श्री बापू वाघमारे यांनी सरांसोबतच्या सुखद आठवणींना उजाळा दिला. सरांचा सौजन्यपूर्ण सरळ स्वभाव , विद्यार्थिनींप्रती असलेले वात्सल्य,सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा गुण आणि दिखाऊपणा न करता प्रामाणिकपणे ज्ञानदान केल्याने विद्यार्थिनींचे झालेले उत्थान याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.
सरांची भाची सौ. अस्मिता अंकलगे यांनी देखील कौटुंबिक जीवनामध्ये सरांनी अतिशय यशस्वीपणे निभावलेल्या विविध भूमिका सुरसपणे मांडल्या.

सोहळ्याच्या सत्कारमूर्ती श्री.सुनिल पाटील यांनी आपल्या जन्मदात्या मात्यापित्यांचे ऋण व्यक्त करत कुटुंबीयांबरोबर च आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमापर्यंत ज्या ज्या व्यक्तींच्या योगदानामुळे त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरम्य झाला त्या त्या सर्वांप्रती हार्दिक कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जीवनाला परीसस्पर्श करून त्यांच्या जीवनाचे सोने करणारे वीरसेवा दलाचे संस्थापक ऍड.श्री बाबासाहेब कुचनुरे यांच्या हृद्य आठवणी सांगितल्या तसेच आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग आणि आठवणींना उजाळा दिला.

शाळा समितीचे माननीय सदस्य श्री दीपक चौगुले व श्री शरद पाटील यांनी सरांच्या सरळ निष्कपट स्वभावाचे कौतुक करून कुंभार जसा मडके घडवितो त्याप्रमाणे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाची जडणघडण करणारे श्री सुनील पाटील सर यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी  सेवापूर्तीनंतर उर्वरित जीवनासाठी सरांना  शुभेच्छा देऊन उच्च माध्यमिक विभाग प्रमुख डॉ. अविनाश पाटील  यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका श्रीमती विजया पाटील,अंतर्गत परीक्षा नियोजन मंडळ प्रमुख श्री आक्कोळे सर,श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री. शांतिनाथ चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या सुंदर सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन कु. ज्योती पाटील व श्री. प्रसन्न शास्त्री यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या