उमेदवारहो... सांगलीसाठी योगदान आणि संकल्प काय?, लोकहित मंचचा सवाल : प्रश्नांवर पोकळ जाहीरनामे नकोत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2024 1:39 PM

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आश्वासनांचा पाऊस दरवर्षी पाडला जातो. प्रत्येकवेळी जाहीरनाम्यात तेच प्रश्न पुन्हा येतात. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उभारलेल्या उमेदवारांनी आजपर्यंत सांगली जिल्ह्यासाठी काय योगदान दिले, कोणते प्रश्न सोडविले हे स्पष्ट करुन भविष्यातील संकल्प सांगावेत. त्याच्यासाठीची मुदतही जाहीर करावी, असे आवाहन लोकहित मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
मंचने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, यंदाच्या निवडणुकीत काही नवे व काही जुने उमेदवार उभे आहेत. विद्यमान खासदारही आहेत. या सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाताना आजवर दिलेल्या योगदानाचा लेखाजोखा मांडावा. जिल्ह्यातील नागरिकांना सतावणारे प्रश्न आजवर का सुटले नाहीत, याचे उत्तर जनतेला द्यावे. केवळ औपचारिकता म्हणून जाहीरनामे प्रसिद्ध करुन जनतेची दिशाभूल करु नये, असे आवाहन केले आहे.

*हे प्रश्न का सुटले नाहीत?*
*जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न आजही कायम आहे पाणी न दिल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दुष्काळी भागातील जनता देत आहे.
*पाटबंधारे विभागाच्या गैरनियोजनामुळे कृष्णा नदी काेरडी पडून सांगली, कुपवाडमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे.
*महापुरात जिल्ह्याच्या चार तालुक्यातील जनता वारंवार संकटात सापडत आहे. त्यावर कोणतेही उपाय नाहीत
*कृष्णा नदीत दररोज ११० गावांचे सांडपाणी मिसळून प्रदूषण वाढत आहे. नागरिकांच्या, जलचरांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. त्यावर आजपर्यंत पाऊल उचलले गेले नाही
*ड्रग्ज तस्करी, गांजा तस्करीसह अन्य अंमली पदार्थांच्या तस्करीत सांगली जिल्ह्याचे नाव वारंवार कुप्रसिद्ध होत आहेत. देशभरात जिल्ह्याची बदनामी होत असून येथील तरुणाई नशेच्या विश्वात गुन्हेगारीकडे वळत आहे. यावर एकाही नेत्याने कधी मत मांडले नाही
*एकीकडे महामार्ग बनविले जात असताना शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने अपघात वाढत आहेत.

*ड्रायपोर्ट उभारण्यास लाल कंदिल मिळाल्यानंतर सलगरेच्या ३५० एकर माळावर लॉजिस्टिक पार्कचे आश्वासन दिले गेले, पण जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथाॅरिटीने त्यालाही नकार दिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे काय होणार, हे स्पष्ट करावे.
*कवलापुरात विमानतळाला तत्त्वत: मंजुरी मिळाल्याचे वारंवार सांगितले गेले, पण अजूनही विमानतळ उभारण्याबाबत कोणताही आदेश नाही.
*जिल्ह्यात आयटी पार्कसाठी पुणेस्थित कंपन्यांनी भेटी दिल्या, पण त्यासाठी कोणतेही प्रयत्न राजकीय, प्रशासकीय पातळीवर का झाले नाहीत ?
*म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १४०० कोटी, २०० मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याच्या आश्वासनाचे काय झाले?
*जिल्ह्यासाठी शक्तिपीठ आणि ग्रीनफिल्ड हे दोन नवे महामार्ग मंजूर झाले असले तरी शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधावर नेते का बोलत नाहीत?
*जतच्या दुष्काळी भागाला पाण्यासाठी तुबची-बबलेश्वर योजनेचे आश्वासन दिले. पण, प्रत्यक्ष कोणतेही प्रयत्न नाहीत.
*जतच्या पूर्व भागातील ६४ गावांसाठी म्हैसाळ योजनेचा सहावा टप्पा म्हणून १९०० कोटींची तरतूद केली. प्रत्यक्षात या कामासाठी एक पाऊलही पुढे पडलेले नाही.
*सांगलीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे काम ठप्प आहे.


*मनोज भिसे - अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या