काम न करता केली बिलाची उचल, मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथील प्रकार

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 07/05/2024 10:18 PM




गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी बहुल मुलचेरा तालुका मुख्यालयापासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगनूर येथे सुरु असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या नवीन बांधकामाचे काम सुरु असून सदर कामामध्ये 7,49,525 रुपयाचे विद्युत जोडणीचे काम सुद्धा मंजूर करण्यात आले परंतु सदर काम पूर्ण न करता सदर कामाचे संपूर्ण बिल उचलल्याचे धक्कादायक प्रकार मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथे दिसून आले असून यामध्ये कनिष्ठ अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत असून सदर कार्य अपूर्ण असून सुद्धा त्याचे देयक स्वाक्षरी करून कनिष्ट अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी कंत्राटदाराला कसे दिले हा खूप मोठा प्रश्न उत्पन्न होत आहे.

अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र देविकार व जिल्हा सचिव राजेश नाथानी यांना याबाबत माहिती झाली व माहितीच्या आधारे त्यांनी वेंगनूर येथे भेट दिली असता सदर उपकेंद्रामध्ये सौर ऊर्जेवर आधारित विद्युत फिटिंग ची कामे बंद अवस्थेत दिसून आली तसेच काही केसिंग व वायर ची कामे वगळता कुठलीही कामे करण्यात आली नव्हती यामुळे सदर काम न करता रक्कम का उचलण्यात आली? असा प्रश्न निर्माण होत आहे.

याबाबत ग्राम पंचायत वेंगनूर येथील सरपंच यांना याबाबत विचारणा केली असता सदर उपकेंद्रात कुठलेही सौर ऊर्जेचे काम करण्यात आले नसून या कामाचे रक्कम उचलले असल्याची माहिती सुद्धा आपल्याला नव्हती अशी माहिती सरपंच यांनी दिली. यामध्ये कनिष्ट अभियंता व उपविभागीय अभियंता हे सुद्धा संशयांच्या भोवऱ्यात दिसूत येत आहेत. सदर कामाचे पूर्ण देय 22 डिसेंबर 2023 ला पारित करण्यात आले परंतु या तारखेला कोणत्याच प्रकारचा काम झालेला नव्हता.

यापूर्वीसुद्धा भारतीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 2018 ते 2021 पर्यंतची माहिती जिल्हा परिषद गडचिरोली येथील विद्युत विभागाचे कानिष्ठ अभियंता यांना मागितली होती व सदर माहिती पुरवण्याकरिता तब्बल 43 हजार 786 भरण्याचे पत्र सुद्धा देवेंद्र देविकार यांना प्राप्त झाले होते व सदर पत्राचे अनुषंगाने देवेंद्र देविकार यांनी 28 जानेवारी 2022 ला  43786 रुपये भरून सुद्धा त्यांना अजून पर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून सदर माहिती मध्ये सुद्धा काही गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीची सखोल चौकशी आता वरिष्ठ अधिकारी करून काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या