'पाणी द्या... पाणी द्या... आयुक्त साहेव पाणी द्या...' : पाण्यासाठी सांगवीकरांचा मनपावर धडकला मोर्चा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/05/2024 7:01 PM

नांदेड : मागील दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नांदेड उत्तर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांचा हाहाकार उडाला आहे. असे असतांनाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे यांच्या नेतृत्वात आज सांगवीकरांनी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. 'पाणी द्या... पाणी द्या... आयुक्त साहेब पाणी द्या...' असा आर्त टाहो फोडणाऱ्या आंदोलकांचे निवेदन घेण्यासाठीही आयुक्त आंदोलकांपर्यंत आले नाहीत. त्यामुळे आंदोलक चांगलेच भडकले होते.

नांदेड उत्तर भागात गेल्या दहा दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी उद्भव व्यवस्था म्हणून आसना नदी येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यातून नांदेड उत्तर भागाला पाणी पुरवठा करता येतो, याची माहिती आयुक्तांना नसावी एवढी केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा दिवसांपासून सांगवी भागातील नागरिक घागरभर पाण्यासाठी भटकंती करीत असतांनाही आयुक्तांनी या भागातील जनतेची साधी समस्याही जाणून घेतली नाही. महापालिकेचा कोणताही अधिकारी टंचाईग्रस्त भागात फिरकला सुद्धा नाही. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. आज पाणी येणार... उद्या पाणी येणार... अशी बतावणी करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात अखेर आज संतापाचा उद्रेक झाला. सांगवी प्रभागाचे नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. महापालिका प्रशासन मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलक मनपावर धडकले. यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांना मनपाच्या दारातच रोखले. मनपा दारासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. निवेदन घेण्यासाठी आयुक्त स्वतः खाली आले. या मागणीवर आंदोलक अडल्याने तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र पाणी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे मनपा प्रशासनाचे चांगलीच दमछाक झाली. अखेर आयुक्तांनी सांगवी भागात येत्या बारा तासात मुबलक पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले; परंतु २४ तासात पाणी आले नाही तर शहरात चक्का जाम करू आणि तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्याम कोकाटे यांनी दिला आहे.

(चौकटीत)

चिमुकल्यांना घेऊन महिला आंदोलनात

गेल्या दहा दिवसांपासून पाणी मिळत नसलेल्या संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चात चिमुकल्या लेकरांसह महिला सहभागी झाल्या होत्या. खांद्यावर चिमुकले बाळ आणि डोक्यावर रिकामी घागर असे विदारक चित्र या आंदोलनात दिसून आले. पाणीबाणी सुरू असतांनाही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या