नांदेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'क्षयमुक्त भारत' संकल्पनेला गती देण्यासाठी आणि नांदेड शहराला पूर्णपणे टीबीमुक्त (TB-free) करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नांदेडकरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी केले आहे. "स्वच्छ आणि सुंदर नांदेडसोबतच आरोग्यदायी नांदेड हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच आपण शहराला क्षयमुक्त करू शकू," असा विश्वास यावेळी महापौरांनी व्यक्त केला आहे. यावेळी पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड शहर हे क्षय मुक्त करण्यासाठी सर्व नांदेड वासियांनी क्षय रोगाची तपासणी करून नांदेड हे क्षयमुक्त करण्याच्या दृष्टीकोणातुन 'जन भागीदारी' च्या संकल्पनेतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.२४ मार्च हा 'जागतिक क्षयरोग दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महपौर व प्रमुख पाहुणे यांनी महात्मा फुले पुतळा येथून निघणाऱ्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली त्याचप्रमाणे या प्रसंगी मान्यवरांनी व उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी यांनी टीबी मुक्त व क्षयरोग निर्मूलनाची शपथ घेऊन सामुहिक स्वाक्षरी मोहीमेचा उपक्रम राबविण्यात आला.
सदरील रॅली सकाळी ठीक ८.३० वाजता आय.टी.आय. जवळील महात्मा फुले यांच्या पुतळया पासून ते जंगमवाडी दवाखाना या मार्गावर काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर, MPW, ANM, GNM, व सर्व आशा वर्कर तसेच जी.डी.गोएंका हेल्थकेअर अकॅडमी व स्वामी विवेकानंद नर्सिंग स्कूल नांदेड चे शिक्षक व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, सहभागी झाले होते. या सर्वांनी रॅलीमध्ये क्षयरोग निर्मूलनाचे फलक हातात धरून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली.
याप्रसंगी शहरातील जास्तीत जास्त क्षय रुग्णांना शोधून उपचारासाठी आणण्याचे काम करणारे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.मृत्युंजय महिंद्रकर, डॉ.भरत तोष्णीवाल, डॉ.समीर कोटलवार यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच नांदेड शहरामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या उत्कृष्ट आशा ताई , NTEP विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी विवेकानंद हाळीकर, रवींद्रकुमार कावडे व कृष्णा भूसेवाड यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर कविता संतोष मुळे, पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपमाहापौर दिपकसिंह रावत, सभागृहनेता अॅड.महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे,डॉ.प्रतिमा कदम, उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बालाप्रसाद कुंटूरकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मो.बदीयोद्दिन यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.