नांदेड :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 8 ते 14 एप्रिल 2026 कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन आज आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.
भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांच्या माध्यमातून भारतीय समजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचिताबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने नमूद केली आहे. भारतीय राज्यघटनेतील या तत्त्वांच्या अनुषंगाने या घटकातील सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी स्पष्ट केले. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना सर्वांना माहीत होण्यासाठी समाज माध्यम व वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी सामाजिक समता सप्ताह निमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती कार्य करण्यात येणार असल्याचे नमूद करुन विविध योजनांची प्रस्ताविकेत माहिती दिली. समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पत्रकार परिषद घेऊन समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे तर समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांचे स्वागत समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी केले तर समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांचे स्वागत आनंद झपलवाड यांनी पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देवून केले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहीकरित्या वाचनही करण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळाचे व्यवस्थापक, ज्येष्ठ नागरीक, वसतिगृहाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर आभार समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी मानले.