दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज विविध स्थानकांवर “डिजिटल अवेअरनेस डे” आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढवणे आणि प्रवाशांमध्ये कॅशलेस व्यवहारांचे फायदे याबाबत जनजागृती करणे हा होता.
या अंतर्गत नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, आदिलाबाद तसेच इतर स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रवाशांशी संवाद साधून डिजिटल पेमेंटचे फायदे, सोय आणि सुरक्षितता यांची माहिती दिली.
आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालय, आदिलाबाद येथील विद्यार्थ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांसह उत्साहाने सहभाग नोंदवून रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्याचा संदेश दिला.
हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान प्रवाशांना तिकीट खरेदी व इतर रेल्वे सेवांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारण्यात आले. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तिकीट बुकिंग व इतर देयके कशी करावीत याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान ५०० हून अधिक प्रवाशांना डिजिटल पेमेंटचे फायदे आणि रेल्वे सेवांसाठी उपलब्ध विविध डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देण्यात आली. यामध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि स्थानकांवरील डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा उद्देश जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवहारांसाठी प्रवाशांना डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे असून, भारत सरकारच्या “डिजिटल इंडिया” संकल्पनेला चालना देणे हा आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबवून डिजिटल सेवांचा प्रसार व प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध डिजिटल प्लॅटफॉर्म :
प्रवासी खालील प्लॅटफॉर्मद्वारे सहज डिजिटल सेवा घेऊ शकतात:
• IRCTC Rail Connect – आरक्षित तिकीट बुकिंगसाठी
• RailOne – एकात्मिक रेल्वे सेवा व डिजिटल प्रवेशासाठी
• BHIM / UPI अॅप्स – तत्काळ डिजिटल पेमेंटसाठी
• QR कोड आधारित तिकीट प्रणाली व स्थानकांवरील POS मशीन
डिजिटल पेमेंटचे फायदे :
प्रवाशांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याची कारणे:
• रांगेत उभे राहण्याची गरज नाही – लांब रांगा टाळता येतात
• जलद व्यवहार – वेळेची बचत
• कॅशलेस सोय – रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही
• सुरक्षित व पारदर्शक – व्यवहारांचा सहज मागोवा
• संपर्करहित प्रवास – स्वच्छता व सुरक्षिततेला प्रोत्साहन
• २४x७ सुविधा – कधीही, कुठेही तिकीट बुकिंग