देगलूर नाका दुर्घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबीयांची महापौरांकडून सांत्वनपर भेट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 18/04/2026 8:11 PM

नांदेड :- नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील इस्लामपुरा परिसरात नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शहर हळहळत आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेडच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी आज मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
 
या भेटी दरम्यान महापौरांनी शोकाकुल पालकांशी संवाद साधून या कठीण प्रसंगात महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे या घटनेत महापालिकेचा निष्काळजीपणा किंवा ठेकेदाराची चूक असल्याचे समोर आल्यास, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. मृत मुलांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत, घरकुल योजनेंतर्गत घरे आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली.

या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेल्या सर्व विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचे फलक आणि बॅरिकेड्स लावण्याचे कडक आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याप्रसंगी महापौरांसोबत स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन, स्थानिक नगरसेवक मसूद अहेमद खान, अ.हफीज बागवान, अ.हबीब बागवान, मो.फसियोद्दीन, अन्सार अहेमद खान,  अल्ताफ अहेमद, मो.अजहर बागवान अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे आणि महापालिकेचे विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या