नांदेड:-30 जुलै जागतिक मानव तस्करीविरोधी दिनानिमित्त डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या संकल्पनेतुन शहरातील पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज आणि यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांमध्ये मानव तस्करीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक माहिती देणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान मानव तस्करी म्हणजे काय, तिचे प्रकार, फसवणुकीच्या विविध पद्धती, सोशल मीडियाद्वारे होणारे आमिष, अल्पवयीन मुला-मुलींची सुरक्षितता, महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता या विषयावरही माहिती देण्यात आली. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अटक (Digital Arrest), UPI व QR कोड फसवणूक, OTP, CVV व बँकिंग माहिती कोणालाही न देणे, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची खबरदारी, सायबर हेल्पलाईन 1930, राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल तसेच महिला सहायक कक्षाचे कार्य भुमिका महिलासाठी असलेले हेल्पलाईन नंबर, प्रेम आणि आकर्षण याचे वास्तव, सोशल मिडियाचे फायदे - तोटे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे समाधान करून सुरक्षित व जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात अश्विनी गायकवाड, महिला पोलीस उप निरीक्षक, सचिन सोनवणे, पोलीस उप निरीक्षक, मोनिका बिरादार, समुपदेशक, मपोकॉ/यशोदा केंदे, पोकॉ/व्यंकटेश सांगळे व सर्व दामिनी पथक यांनी विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.
नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानव तस्करीसंदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर माहिती द्यावी. मानव तस्करीमुक्त व सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी विद्यार्थी हे समाजाचा एक संवेदनशिल घटक व प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.