स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यासाठी महापौरांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश;संबंधित प्रभागांतील नगरसेवकांनी मांडल्या आक्रमकपणे समस्या

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/07/2026 6:31 PM

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी शहरातील नागरी समस्यांची गंभीर दखल घेत आज महापालिकेतील झोन क्रमांक ०१ व झोन क्रमांक ०२ अंतर्गत येणाऱ्या स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाची एक महत्त्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक घेतली. महापालिका मुख्यालय येथील महापौरांच्या बैठक कक्षात पार पडलेल्या या बैठकीस दोन्ही झोनमधील संबंधित प्रभागांचे नगरसेवक आक्रमकपणे उपस्थित होते. त्यांनी आपापल्या भागातील प्रलंबित समस्यांचा पाढा महापौरांसमोर वाचला.

या बैठकीला महापालिकेचे *उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, गटनेता संदिपसिंघ गाडीवाले,* नगरसेवक सतीश देशमुख, उमेश पवळे, किशन कल्याणकर, सुहास कल्याणकर, मिनल पाटील, शांभवी साले, साहेबराव गायकवाड, दयानंद वाघमारे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्षेत्रीय अधिकारी नागनाथ पतंगे, राजेश पाटील आणि इतर तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

झोन १ व २ मधील काही भागांत कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. त्यावर महापौरांनी जलवाहिन्यांवरील गळती २४ तासांच्या आत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच प्रभागांमधील अंतर्गत रस्ते आणि मुख्य चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. घंटागाड्या वेळेवर येणे, प्रत्येक प्रभागात नियमित झाडलोट होणे आणि स्वच्छता कामगारांची संख्या वाढविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाळा व ड्रेनेज लाईन रिस्टोरेशनचे काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावर सांडपाणी येण्याच्या प्रकारांवर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांनी ड्रेनेज चेंबरची त्वरित सफाई व दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच उघड्या नाल्यांमध्ये गाळ साचू न देता तो तातडीने उपसण्याचे आदेश यंत्रणेला दिले.

या आढावा बैठकीत झोन क्र.०१ आणि झोन क्र.०२ मधील सर्व नगरसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. नगरसेवकांनी प्रभागातील अपुरे स्वच्छता कर्मचारी, मुख्य ड्रेनेज वाहिन्यांची दुरवस्था आणि काही वस्त्यांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याची असलेली गरज याकडे महापौरांचे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधींच्या या तक्रारींची नोंद घेत महापौरांनी प्रशासनाला नगरसेवकांशी समन्वय ठेवूनच कामांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.

महापौरांचे आवाहन व सक्त ताकीद:
"नांदेड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे. झोन क्र.०१ आणि ०२ मधील नागरिकांकडून पाणी आणि अस्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री अहवाल न देता प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांची पाहणी करावी. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल."
महापालिकेच्या वतीने झोननिहाय अशा आढावा बैठका यापुढेही सुरू राहणार असून, पुढील आठवड्यात झालेल्या कामांचा पुनरावलोकन अहवाल सादर करण्याचे आदेशही महापौरांनी संबंधीत विभाग प्रमुखांना दिले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या