नांदेड :- भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने आज 'संसद भवन विस्तार' इमारतीत भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाची बैठक पार पडली. ही बैठक या मैत्री गटाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सदर मैत्री गटाच्या या पहिल्याच बैठकीत प्रामुख्याने दोन्ही देशांमधील व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यावर सखोल चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये कोणत्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यास वाव आहे, याबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी बैठकीत माहिती दिली. तसेच, भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील आर्थिक व व्यापारी सहकार्य वाढल्यास दोन्ही देशांना विशेषतः भारताला कोणते लाभ होतील, यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. द्विपक्षीय संबंधांना नवी गती देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुढील बैठकीत अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो ऑगस्टिन कॉसिनो तसेच भारतातील प्रमुख व्यापार व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाचे सदस्य, संसदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.