‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची विशेष मोहीम;महाविद्यालयांच्या समान संधी केंद्रामार्फत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/09/2026 12:44 PM

नांदेड : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेडच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, तसेच प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान विद्यार्थी, पालक तसेच संबंधित महाविद्यालयांचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्ज प्रक्रिया, त्रुटींची पूर्तता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*समान संधी केंद्रामार्फत अर्ज स्वीकारणार*

अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) तसेच विमाप्र आदी राखीव प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अद्याप ऑनलाइन अर्ज केलेला नाही, त्यांनी संबंधित प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्जाची प्रत काढून त्यासोबत आवश्यक मूळ कागदपत्रे व पुरावे जोडून महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राकडे जमा करावेत.
इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संबंधित महाविद्यालयांनीही ‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत महाविद्यालय स्तरावर विशेष मोहीम राबवावी. समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज व प्रस्ताव एकत्रितरित्या स्वीकारून ते समितीकडे सादर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
महाविद्यालयांनी विशेष मोहिमेत प्राप्त झालेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधून विहित पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या