विद्यार्थीनींच्या मनातील प्रश्नांना मिळाला विश्वासाचा आधार...! , डॉ शिल्पा पाटील यांच्याकडून संवेदनशील विषयावर मोकळा संवाद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/09/2026 6:27 AM

***डॉ. शिल्पा पाटील यांचा किशोरवयीन मुलींसाठी ‘गुड टच–बॅड टच’पासून मासिक पाळीपर्यंतच्या संवेदनशील विषयांवर मोकळा संवाद

*सांगली :* किशोरवय हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. या काळात मनात निर्माण होणारे प्रश्न, संकोच आणि समस्यांना योग्य वेळी विश्वासाचा आधार व शास्त्रीय मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. याच उद्देशाने लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल (माध्यमिक व उच्च माध्यमिक), यशवंतनगर, सांगली येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी विशेष संवाद व मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आला.
             समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगलीच्या संचालिका डॉ. शिल्पा रवींद्र पाटील यांनी विद्यार्थिनींशी अत्यंत आपुलकीने, मोकळेपणाने आणि विश्वासपूर्ण वातावरणात संवाद साधला. विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्न, शंका व संकोच समजून घेत त्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले.
             यावेळी डॉ. शिल्पा पाटील यांनी किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता व घ्यावयाची काळजी, स्वतःच्या आरोग्याची काळजी, ‘गुड टच–बॅड टच’, सुरक्षितता, एकटेपणाच्या प्रसंगी घ्यावयाची दक्षता आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच फॅशन व बाह्य आकर्षणापेक्षा आपल्या स्वप्नांवर, शिक्षणावर आणि भविष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
              सांगली जिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशिका मनीषा शेंडगे यांनीही विद्यार्थिनींना सकस व पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगत बेकरीजन्य व अनारोग्यकारक पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला. किशोरवयीन मुला-मुलींनी आरोग्यविषयक बाबींबाबत सजग राहावे, लैंगिक संबंधातून होणारे विविध संसर्गजन्य आजार, त्यांची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच HIV पॉझिटिव्ह व्यक्तींविषयी गैरसमज दूर करून त्यांच्याशी संवेदनशीलतेने व माणुसकीच्या भावनेने वागण्याचे आवाहन केले. HIV पॉझिटिव्ह व्यक्तींचे विवाह घडवून आणण्यासाठी केलेल्या समुपदेशनाच्या अनुभवाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
            ‘ऐकून घेणारा एक विश्वासू संवाद अनेक प्रश्नांना योग्य दिशा देऊ शकतो’ या भावनेतून झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आरोग्यविषयक जागरूकता आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण करण्यास मोलाची मदत झाली.
              कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव केदार यांनी केले. सूत्रसंचालन साधना सातपुते यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षिका सुनीता जगदाळे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Share

Other News

ताज्या बातम्या