ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/14/2020 10:18:06 PMजिल्ह्यांनी आवश्यकते नुसार आगाऊ मागणी नोंदवावी

*अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे*
 
मुंबई, दि.14; राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नियोजन  करुन ऑक्सीजन पुरवठा करावा असे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सीजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
कोविड १९ च्या रुग्णांच्या उपचरासाठी लागणारे  ऑक्सीजन पुरवठा करतांना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शिंगणे यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे 500 मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या  एक हजार पेक्षा जास्त ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे.  तरिही काही ठिकाणी ऑक्सीजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवुन  योग्य सहकार्य करुन गरजुंपर्यंत ऑक्सीजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ऑक्सीजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसविर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सीजनचा साठा याचाही   डॉ. शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.

*नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुम*
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सीजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकीत्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपली मागणी नोंदवितात.जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सीजन तातडीने त्या जिल्ह्याला  उपलब्ध करुन दिल्या जाते. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८ ०० २२२ ३६५ तसेच ०२२ २६५९२३६४ हा लॅण्डलाईन क्रमांक कार्यान्वित आहे.

Share

Other News