अण्णा हजारे ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे : कल्पना इनामदार

  • Rameshwar Suryawansh (Latur)
  • Upadted: 25/02/2026 10:17 AM

अण्णा हजारे ही एक व्यक्ती नसून 

एक विचार आहे : कल्पना इनामदार 

 लातूर : समाजात विविध समाजोपयोगी कामे अण्णा हजारे यांनीच केले पाहिजे असे नाही. अण्णा ही व्यक्ती नसून एक विचार आहे आणि तो विचार प्रत्येक जागरूक नागरिकाने आत्मसात केला पाहिजे, असे प्रतिपादन  राष्ट्रीय लोकआंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार यांनी केले. 
       अण्णा हजारे प्रणित  राष्ट्रीय लोकआंदोलन न्यासचे जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी गरजूंना अन्नधान्याचे किटही  वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, एड. संतोष गिल्डा ,न्यासाचे जिल्हाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब नंदवे, जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी, खजिनदार दत्ताभाऊ आवारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील  तालुका अध्यक्षांना इनामदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
आपल्या मार्गदर्शनात कल्पनाताई इनामदार यांनी आजमितीस संघटन किती महत्वाचे आहे याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले. संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा असा संदेश दिला होता. त्या संदेशाचे महत्व आज पदोपदी जाणवत असल्याचे सांगून इनामदार यांनी आज देशातील सामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. ही बाब चिंताजनक आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना सामान्य नागरिकांशी काहीही देणे घेणे नसते. सामान्य मनुष्य कोणत्या स्थितीत जगतोय हे कोणत्याही सरकारला पडलेले नाही. आपली लढाई व्यवस्थेविरोधात आहे, कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. व्यवस्था बदलण्यासाठी संघटन बांधणी अतिशय गरजेचे आहे. अण्णा हजारे यांनी सामान्यांसाठी असंख्य कामे केली आहेत. देशात बदल घडवून आणण्याचे काम अण्णांनी केले आहे.  प्रत्येक व्यक्तीने अण्णा हजारे यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.संघटन माणसाला, समाजाला मजबूत करत असते. अण्णांचा विचार चालवणारी मंडळी सक्रिय राहिली पाहिजे. अण्णांनी कार्यकर्त्यांना जिवंत ठेवणे गरजेचे आहे. संघटन  मजबुतीसाठी आपण संपूर्ण देशात दौरे करतो, असेही त्यांनी नमूद केले. संघटन मजबुतीसाठी लोकशिक्षण, समाज जागृती आणि सभासद नोंदणी आवश्यक असून त्यावर पदाधिकाऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन केले.  
 यावेळी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, एड. संतोष गिल्डा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तात्यासाहेब नंदवे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विस्तृतपणे विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हातिमभाई शेख यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शनात त्यांनी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने स्वखर्चातून तब्ब्ल दोन लाख रुपयांचे अन्नधान्य वाटप करून गोर गरीब गरजूंच्या उदरनिर्वाहाचा तात्पुरता प्रश्न मिटवल्याचे सांगितले.   याप्रसंगी विकास खटके, असलम  शेख, अनिकेत वलांडे, रवींद्र गायकवाड, राहुल गायकवाड, किशोर रणदिवे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

Share

Other News

ताज्या बातम्या