नांदेड :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षासाठी व्यक्ती आणि संस्था यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून पुढे 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तरी पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.
इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत संबंधित शासन निर्णय व शुद्धीपत्रकांनुसार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या वरील पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून रीतसर अर्ज मागविण्यात येत आहेत.
*अटी व शर्ती*
अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा इतर क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारसपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.