‘संगीत शंकर दरबार नांदेडच्या सांस्कृतिक वैभवाचा आविष्कार - जिल्हाधिकारी कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/02/2026 8:59 PM

नांदेड :- पुण्यातील  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव,वसंतोत्सवाच्या तोडीचा  नांदेडमध्ये होणारा ‘संगीत शंकर दरबार’ हा त्याच उंचीचा आणि दर्जाचा सांस्कृतिक सोहळा आहे, असे गौरवोद्गार नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले. 
साहित्य आणि संगीत यांप्रती असलेल्या आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती देत कर्डिले म्हणाले, “दोन-तीन दशकांच्या सातत्यपूर्ण परंपरेतून ‘संगीत शंकर दरबार’ घडत आला आहे. ही केवळ मैफल नाही, तर नांदेडच्या सांस्कृतिक जाणिवेचा, अभिरुचीचा आणि समृद्ध परंपरेचा उत्सव आहे.”
ते पुढे म्हणाले, “शास्त्रीय संगीतासारख्या गंभीर, साधनेची मागणी करणाऱ्या कलाप्रकाराला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रसिकांची उपस्थिती लाभणे, हे नांदेडच्या सांस्कृतिक परिपक्वतेचे द्योतक आहे. राग-रागिण्यांच्या सुरेल प्रवाहात तल्लीन होणारा हा जनसमुदाय पाहिला की, आपल्या जिल्ह्याची सांस्कृतिक उंची अभिमानाने जाणवते.असे गौरवोद्गार काढले.
कर्डिले यांनी नमूद केले की, अशा दर्जेदार कार्यक्रमांमुळे केवळ कलावंतांना व्यासपीठ मिळत नाही, तर नव्या पिढीमध्येही शास्त्रीय संगीताबद्दल आकर्षण आणि आदर निर्माण होतो. “संगीत ही केवळ करमणूक नसून आत्मसंवादाची, चिंतनाची आणि संस्कारांची साधना आहे.   सुरांच्या या मंगल सोहळ्याने नांदेडची सांस्कृतिक पताका राज्यभर अभिमानाने फडकत असल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
संगीत शंकरदरबार चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले,माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य  कार्यक्रमाचे संयोजक अशोकराव चव्हाण,आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी राज्यमंत्री डि.पी.सावंत, डॉ. राम बोरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डि.पी. सावंत नरेंद्र दादा चव्हाण,संजय जोशी  यांनी केले.
प्रास्ताविक शारदाभवन एज्युकेशन सोसायटी चे सचिव डि.पी. सावंत यांनी  प्रास्ताविक केले.
या सुरेल सोहळ्यात बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या आठवणींना भावनिक स्पर्श दिला. “नांदेडसारख्या शहरात शास्त्रीय संगीत आणि संगीत नाट्याला मिळणारा प्रतिसाद हा केवळ कलावंतांचा नव्हे, तर रसिकतेचा विजय आहे,” असे ते म्हणाले.
आपले वडील, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्यांना संगीत नाटकांची विलक्षण आवड होती. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर किंवा शिवाजी मंदिर येथे नाटक असेल तर वेळ काढून ते आवर्जून उपस्थित राहत. त्यांच्या सहवासातूनच रसिकतेची दृष्टी लाभली, असे नमूद करत त्यांनी या स्मृती चिरंतन राहाव्यात, या भावनेतून गेली बावीस वर्षे हा संगीत सोहळा सुरू असल्याचे सांगितले.
मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी जायकवाडी प्रकल्प पूर्णत्वाला पन्नास वर्षे होत असल्याचा उल्लेख केला. “संगीत ही आत्म्याची मेजवानी आहे; ती नांदेडच्या रसिकांना सातत्याने मिळावी, हा आमचा उदात्त हेतू आहे,” असे ते म्हणाले.
लातूरचे ज्येष्ठ तबलावादक राम बोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना त्यांनी त्यांच्या कलेचे मनःपूर्वक कौतुक केले आणि “या पुरस्कारानेच नव्हे, तर त्यांच्या साधनेने या सोहळ्याची उंची वाढली आहे,” असे गौरवोद्गार काढले.
उद्घाटन समारंभाचे संचालन प्रा.विश्वाधार देशमुख यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या