बामणी येथे आभा नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आभा कार्ड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/02/2026 8:11 PM

नांदेड :-  जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. 
       मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांच्या समन्वयातून हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जात आहे. अभियानातील सात महत्त्वाच्या घटकांवर नियोजनबद्ध कामे करण्यात आली असून १०० गुणांच्या निकषांनुसार अभिलेख तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आभा  नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला. आभा- आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट  हे १४ अंकी डिजिटल हेल्थ आयडी असून त्यामध्ये नागरिकांची आरोग्यविषयक माहिती सुरक्षितपणे साठवली जाते. या युनिक आयडीच्या आधारे डॉक्टरांना रुग्णांचा वैद्यकीय इतिहास सहज पाहता येतो, त्यामुळे प्रत्येकवेळी दवाखान्यात फाईल नेण्याची गरज राहत नाही. तसेच आभा क्रमांक विमा कंपन्यांशी जोडलेला असल्याने विविध आरोग्य योजनांचा लाभ वेगाने मिळण्यास मदत होते.
      जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आभा नोंदणीची मोफत मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः ऑनलाईन नोंदणी करावी किंवा जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन आभा कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
     यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी स्वतः बामणी येथील शिबिरात आभा कार्ड काढून घेत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. शासकीय वैद्यकीय अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सर्व नागरिकांची आभा नोंदणी पूर्ण करावी, असेही त्यांनी नमूद केले. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल गटविकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत तालुक्यातील सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या