साताऱ्यात प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; ब्लास्टिंगला परवानगी न देण्याची मागणी

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/04/2026 8:25 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा : दि:जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी माने तसेच निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांची उपस्थिती होती. कळंबे, डफळवाडी, निवडे, सावरघर, भोकरवाडी आदी गावांतील ग्रामस्थ, पर्यावरणवादी तसेच अभ्यासू वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी गावनिहाय हरकती व विविध मुद्दे ठामपणे मांडले. विशेषतः कळंबे व डफळवाडी येथील नागरिकांनी स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडत प्रस्तावित प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. इतर गावांतील ग्रामस्थांनीही पर्यावरण, शेती व जनजीवनावर होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर मांडणी केली.

सर्व ग्रामस्थांमध्ये एकमत झाल्याने प्रशासनालाही या मुद्यांची दखल घ्यावी लागली. जोपर्यंत सर्व प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक होत नाही, तोपर्यंत ब्लास्टिंगला परवानगी देऊ नये तसेच प्रकल्पाचे सुरू असलेले काम तात्काळ थांबवावे, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडत संबंधित कंपनीला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रशासकीय पातळीवर समिती स्थापन करून प्रकल्प व कथित अनधिकृत कामांची पाहणी करण्यात येईल, ही समिती गावागावांत भेट देऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेईल आणि ते तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. नियमबाह्य काम आढळल्यास ते त्वरित थांबवून संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने सर्व मुझ्यांवर सविस्तर चर्चा होऊन ते अधिकृत नोंदीत आले, ही बाब ग्रामस्थांसाठी आशादायक ठरली. यापुढेही एकजुटीने लढा सुरू ठेवून न्याय मिळवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. बैठकीस उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले

Share

Other News

ताज्या बातम्या