नांदेड - जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणीपुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने स्टॉप डायरिया अभियान या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ बी. एन. संगनवार तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई उपस्थित होते.
स्वच्छ जल, समुचित स्वच्छता - डायरियापासून बचावाची खात्री हे अभियानाचे ब्रीदवाक्य असून, ही मोहीम १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य पर्यवेक्षक, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तालुका गट समन्वयक व तालुका समूह समन्वयक यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गावातील पाणीपुरवठा योजनांची पाहणी, पाईपलाईन गळती दुरुस्ती, ग्रामसभा व बैठकींच्या माध्यमातून जनजागृती, पाणी गुणवत्ता तपासणी, गृहभेटी, वैयक्तिक स्वच्छता व साबणाने हात धुण्याबाबत मार्गदर्शन यावर भर दिला जाणार आहे.
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पाणी स्रोतांची तपासणी, घरगुती नळजोडण्यांची स्थिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, तसेच हागणदारीमुक्त व शाश्वत स्वच्छ गाव संकल्पना बळकट करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डायरिया व इतर जलजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व ग्रामपंचायती, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.