आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश;अर्धापूर तालुक्यासाठी ७.२४ कोटींचा निधी मंजूर,नाला खोलीकरण-रुंदीकरण कामांना वेग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/06/2026 7:58 PM

अर्धापूर :- अर्धापूर तालुक्यातील जलसंधारण आणि शेती विकासाला मोठी चालना मिळाली असून आमदार श्रीजया चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ७ कोटी २४ लाख ४ हजार ४३० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तालुक्यातील २९ हजार ७०० मीटर लांबीच्या नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत असून अनेक ठिकाणी कामांना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे भूजल पातळीत वाढ, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि शेतीची सुपीकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  बहुतांश शेती पावसावर अवलंबून असलेल्या अर्धापूर तालुक्यात जलसाठा वाढविणे आणि भूजल पुनर्भरण मजबूत करणे ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून आमदार श्रीजया चव्हाण यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर नाल्यांमधील पाणीसाठवण क्षमता वाढणार असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांना मोठा फायदा होणार आहे.राज्य सरकारच्या ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ या उपक्रमाच्या माध्यमातून जलसुरक्षा बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेत स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. धरणे व नाल्यांमधील गाळ काढून जलसाठ्यांची क्षमता वाढविण्यासोबतच तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनक्षमतेत भर पडते.
अर्धापूर तालुक्यातील विविध गावांमधून नाला खोलीकरण व रुंदीकरणाची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्रीजया चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ७.२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांना हिरवा कंदील मिळाला.या योजनेअंतर्गत कामठा-खडकी नाला, खडकी-मेंढला नाला, सांगवी-मेंढला नाला, लहान-लोणी खुर्द नाला, निमगाव-सिंचन तलाव नाला, चिंचबन-अर्धापूर नाला, अर्धापूर-इसामपूर नाला, अहमदपूर (डी)-इसामपूर नाला, इसामपूर-सांगवी नाला, शेणी शाखा नाला, गणपूर-सांगवी नाला, देळूब बु.-देळूब कोपब नाला, देळूब बु.-कोंढा शाखा नाला तसेच जावळा शिवार-भोगाव शाखा नाला या कामांचा समावेश आहे.उन्हाळ्यात नाल्यांतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने गाळ काढल्यानंतर जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच नाल्यातून निघणारा सुपीक गाळ शेतात टाकल्याने कृषी उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे या योजनेचा थेट लाभ शेतकरी, ग्रामस्थ आणि जलसाठा क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे.निधी मंजूर करून विकासकामांना गती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार श्रीजया चव्हाण यांचे आभार मानले असून भविष्यातही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न त्यांच्या पुढाकारातून मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या