नांदेड :- राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना २०२६-२७ अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत आपले सरकार पोर्टल https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en वर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदान असणे आवश्यक आहे. तसेच वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. संबंधित कलाकाराची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून असावी किंवा पूर्वी कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारास सध्या अन्य कोणतेही उत्पन्न नसावे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर नियमित मासिक पेन्शन अथवा तत्सम शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
अर्जासोबत वयाचा पुरावा, आधार कार्ड, उत्पन्न व रहिवासी दाखला, इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, बँक खात्याचा तपशील, तसेच लागू असल्यास दिव्यांग, विधवा/परित्यक्ता, पुरस्कार, शिफारसपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती या योजनेस लागू राहतील. पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.