नांदेड :- पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ घरकुले उपलब्ध करून देण्यात यावीत. तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा करून सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे निर्देश नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महापौर मुळे यांनी शहरातील घरकुल योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी *उपमहापौर दीपकसिंह रावत, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते अॅड.महेश कनकदंडे,* नगरसेवक उमेश चव्हाण, अभिषेक सौदे, संजय घोगरे, किशोर भवरे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त नितीन गाढवे, विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, उपअभियंता हफिजउल्ला खान आदी उपस्थित होते.
शहरातील प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत मंजुरी मिळूनही अपूर्ण असलेल्या घरकुलांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या लाभार्थ्यांच्या घरांचे टप्पे पूर्ण झाले आहेत, त्यांना पुढील हप्ते वेळेवर मिळावेत जेणेकरून बांधकामे रखडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश महापौरांनी दिले.तसेच नवीन लाभार्थी नोंदणी (PMAY 2.0) आणि प्रलंबित अर्जांची पडताळणी करून तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
घरांच्या बांधकामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका आणि योजनेत पूर्ण पारदर्शकता ठेवावी, असे महापौरांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे घरकुल मंजुर करण्यासाठी कोणत्याही दलालास बळी न पडता आर्थिक फसवणुक टाळण्यासाठी नागरीकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक, महापौर व इतर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले. नांदेड शहराच्या विकासासाठी आणि गरीबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे, असेही यावेळी महापौर कविता संतोष मुळे यांनी नमूद केले.