नांदेड :- बसवेश्वर नगर,जुना कौठा परिसर येथील श्री लक्ष्मी नृसिंह (नरोबा) मंदिर देवस्थान येथे दि.२४ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत १६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह,श्रीराम कथा व श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर संस्थान व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून आठ दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय होणार आहे. सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, अभिषेक,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,श्रीराम कथा,हरिपाठ तसेच दररोज रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहातील दैनिक कार्यक्रमानुसार पहाटे ५ ते ६ काकडा,सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीराम कथा, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ तर रात्री ८.३० ते ११ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे.दि.२४ एप्रिल रोजी ह.भ.प.गुरुवर्य योगीराज महाराज पैठणकर यांच्या हरिकीर्तनाने सप्ताहास प्रारंभ झाला.दि.२५ एप्रिल रोजी ह.भ.प.आशाताई राऊत लातूरकर यांचे हरिकीर्तन होणार असून दि.२६ एप्रिल रोजी ह.भ.प. गुरुवर्य गुरुराज महाराज देगलुरकर, दि.२७ एप्रिल रोजी ह.भ.प.जगन्नाथ पाटील महाराज (भाषा प्रभू),दि.२८ एप्रिल रोजी ह.भ.प.ज्ञानोबा माऊली शिंदगिकार,दि.२९ एप्रिल रोजी ह.भ.प.भगवान महाराज म्हाळंगीकर तसेच दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प. गणेश महाराज वारंगेकर यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे.
दि.१ मे रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन ह.भ.प.गणेश महाराज वारंगेकर यांच्या उपस्थितीत होणार असून दुपारी १२ वाजता महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.या दिवशी श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.
मंदिर संस्थानच्या कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष श्री गंगाप्रसाद धोंडीबाराव काकडे,सचिव श्री निळकंठ विठ्ठलराव काळे,सहसचिव श्री बालाजी माधवराव सोनवळे, कोषाध्यक्ष श्री देविदास नारायण डुबूकवाड,विश्वस्त श्री रामदेव किशनगोपाल पंडित,श्री तुलजासिंह नारायणसिंह गहेलोत व श्री रामप्रसाद छगनलाल शर्मा आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मंदिर पुजारी व्यंकटेश मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह,श्रीराम कथा व नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन श्री लक्ष्मी नृसिंह नरोबा मंदिर संस्थान व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.