जामखेड तालुक्यात रोजगार हमी योजनेतील तब्बल ₹ 5,90,43,015 मजुरी थकीत; 31,537 दिवसांची मजुरी अडकली

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 24/04/2026 3:37 AM

अहिल्यानगर जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यात केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) काम करणाऱ्या मजुरांची मजुरी जानेवारी 2026 पासून अद्याप जमा झालेली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विविध गावांतील शेकडो मजुरांनी घरकुल, फळबाग, विहीर, गाईगोठा यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या कामांवर श्रम करूनही त्यांच्या हक्काची मजुरी मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कामांचे FTO (Fund Transfer Order) मंजूर झालेले असतानाही निधीअभावी देयके प्रलंबित आहेत. जामखेड तालुक्यातील एकूण थकीत मजुरी तब्बल ₹ 5,90,43,015 (पाच कोटी नव्वद लाख त्रेचाळीस हजार पंधरा रुपये) इतकी असून, एकत्रित 31,537 दिवसांची मजुरी अडकलेली असल्याचे समोर आले आहे.

रोजगार हमी योजनेनुसार काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने मजुरांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, शेतीची कामे यासाठी मजूर हतबल झाले आहेत.

पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करूनही “निधी उपलब्ध नसल्यामुळे पैसे जमा होत नाहीत” असे उत्तर दिले जात असल्याने मजुरांमध्ये संताप वाढत आहे. काही कामांची प्रक्रिया पूर्ण असूनही निधीअभावी मजुरी अडकणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून निधी उपलब्ध करून देत सर्व थकीत मजुरी मजुरांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा संबंधित मजूर व स्थानिक नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जानेवारीपासून मजुरी नाही; रोजगार हमी योजनेवर प्रश्नचिन्ह..

Share

Other News

ताज्या बातम्या