नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख तथा भाषा संकुल संचालक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांना नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका या शिखर साहित्य संस्थेच्यावतीने 'फ्रेंडस ऑफ नवासा' हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे महासचिव सुप्रसिद्ध आफ्रिकी कादंबरीकार डॉ. लेबोगॅंग लान्स नावा यांनी दिनांक २६ एप्रिल रोजी पुरस्काराची घोषणा केली.
साहित्य क्षेत्रातील कवी, लेखक, भाषांतरकार, कार्यकर्ते अशा स्वरूपात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना २०२१ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी दिनांक २३-२४ मे २०२६ रोजी 'नवासा'च्या जनरल असेम्ब्लीमध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे वितरण होणार आहे. 'लेखणी आणि मिसाईल' या विषयावर महासभेत विचारविनिमय होत आहे.
'आनंदोत्सवाचा विश्वसेतू' या डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या ग्रंथामध्ये पंचविस देशातील चाळीस कवींच्या कविता मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आल्या आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेतील समकालीन लेखकांचे साहित्य समाविष्ट आहे. भाषांतरांच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील साहित्याच्या विकास व संवर्धनासाठी प्रयत्न केल्याबद्दल आणि 'कॅलाबॅश' या मुखपत्राच्या सोहळ्यात सहभागी होऊन संस्थेची प्रतिमा उंचावल्याबद्दल डॉ तौर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रशस्तीपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. पृथ्वीराज तौर नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिकेच्या जनरल असेम्ब्लीला समर्थन संदेश देऊन संबोधित करणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील शिखर साहित्य संस्थेकडून 'फ्रेंड्स ऑफ नवासा' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ पृथ्वीराज तौर यांचे स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ ज्ञानेश्वर पवार, परीक्षा संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. पराग खडके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, आयक्युएसी संचालक डॉ सुरेंद्र रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. सुरवसे, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. निलेश देशमुख, डॉ पराग भालचंद्र यांनी अभिनंदन केले आहे.
छायाचित्र - मॉस्को (रशिया) येथील जागतिक लेखक परिषदेत 'नवासा'चे महासचिव डॉ. लेबोगॅंग लान्स नावा आणि डॉ पृथ्वीराज तौर