आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी, प्रतिनिधी : तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, दहिवडी यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाचे कार्यालय समोरच असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून अनेक वेळा किरकोळ अपघात घडल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. तालुक्याच्या मुख्य ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कार्यालयासमोरील खड्डेही वेळेत बुजविण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही करून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा जनतेतून तीव्र उद्रेक होण्याची शक्यता असून आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. आता संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.