भगूर नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 05/06/2026 2:05 PM


भगूर नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
 
भगूर,   जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भगूर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सौ. प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामध्ये नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके,  नगरसेवक विशाल बलकवडे,दिपक बलकवडे, विद्या बलकवडे, लता थापेकर, मृत्युंजय कापसे सहभागी होते.

सध्या वाढते प्रदूषण, तापमानवाढ, कमी होत चाललेली हिरवाई आणि बदलते हवामान या गंभीर समस्या संपूर्ण जगासमोर उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
आजच्या उपक्रमाअंतर्गत भगूर शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला तसेच नगरपरिषद परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. शहर अधिक हिरवेगार व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने भविष्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांनी दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भगूर नगर परिषद लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची योग्य देखभाल करणार असून भविष्यात शहरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यावर भर दिला जाणार आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून ‘एक झाड – एक जबाबदारी’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. नागरिकांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड व संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भगूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे दिनेश कचवे. स्वपनील मोकळ, गितांजली मराडे, सोमनाथ देवकाते, रोशन उगले, रोहित सुरसे, सोनाली शीरसाठ, पुरषोत्तम कुटे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या