नांदेड : भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयामार्फत ‘ज्ञानभारतम’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ‘हर घर दस्तक’ संकल्पनेनुसार घराघरांत उपलब्ध असलेल्या हस्तलिखित ग्रंथ, पोथ्या आणि तत्सम साहित्याची माहिती संकलित केली जाणार असून, नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सचिव, सांस्कृतिक विभाग व मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या १५ एप्रिल २०२६ रोजीच्या पत्रानुसार या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘ज्ञानभारतम’ योजनेचा उद्देश देशातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि व्यापक प्रसार करणे हा आहे.
या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने देशभरातील एक कोटींपेक्षा अधिक हस्तलिखितांचा संग्रह करण्याचे लक्ष्य केंद्र शासनाने निर्धारित केले आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने ‘Gyan Bharatam’ हे विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नियुक्त सर्वेक्षकांना विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, मंदिरे, मठ, ग्रंथालये आणि इतर अभिरक्षक संस्थांमधील हस्तलिखित संग्रहांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरण करणे सुलभ होणार आहे.
‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत गावपातळीवर घराघरांशी संपर्क साधून वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखित पोथ्या, ग्रंथ आणि इतर हस्तलिखित साहित्याची माहिती संकलित केली जाणार आहे. संबंधित साहित्याची माहिती ‘Gyan Bharatam’ मोबाईल ॲपवर स्कॅन करून अपलोड करण्यात येणार आहे.
भारताच्या अमूल्य ज्ञानपरंपरेचे जतन करण्याच्या या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.