लातूर जिल्हा प्रतिनिधी - राजकुमार भंडे
पद्मभूषण मा. अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाची खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी
लातूर, दि. ८ जून – खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते व बियाणे योग्य दरात व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी पद्मभूषण मा. अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, खरीप पेरणीचा हंगाम सुरू झाला असून शेतकरी बांधव खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी धावपळ करत आहेत. दरवर्षी काही ठिकाणी खत व बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्यामुळे प्रशासनाने वेळेत नियोजन करून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक खते व प्रमाणित बियाणे उपलब्ध करून द्यावीत.
निवेदनात जिल्ह्यातील खत व बियाणे विक्रेत्यांची नियमित तपासणी करण्याची, जादा दर आकारणाऱ्या व कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच शेतकऱ्यांना योग्य दरात खते व बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे प्रलंबित असलेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयके तात्काळ अदा करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
प्रशासनाने शेतकरी समस्या सोडवून नाही दिल्या तर न्यास लातूर जिल्हा वतीने आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सचिव लातूर यांच्या वतीने देण्यात आला