निक्षय पोषण योजनेतून २४ क्षयरुग्णांना पोषण आहार किट, उपमहापौर गजानन मगदूम यांच्याकयांच्याकडून क्षयरुग्ण दत्तक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/07/2026 4:11 PM

*** नियमित उपचार व पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित
कुपवाड : प्रतिनिधी
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निक्षय पोषण योजनेअंतर्गत उपमहापौर मा. श्री. गजानन मगदूम यांनी २४ क्षयरुग्ण दत्तक घेत शुक्रवारी (दि. ३१) त्यांच्या हस्ते पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. क्षयरोग निर्मूलनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार यांनी क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच पोषक आहार आणि नियमित औषधोपचाराचे महत्त्व याविषयी माहिती दिली. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजुषा दोरकर यांनी क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून रुग्णांनी उपचारामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी आणि शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
एसटीएस शेख यांनी नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, असा संदेश देत रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत उपचार अर्धवट सोडू नयेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार, डॉ. मंजुषा दोरकर व डॉ. सोहेल मुलाणी यांनी उपमहापौर गजानन मगदूम यांनी २४ क्षयरुग्ण दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पीपीएम समन्वयक सपना देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण रुपनर, श्री. मुजावर, टीबीएचव्ही भारत कुदळे तसेच अ‍ॅलोपॅथिक दवाखाना क्रमांक ४, कुपवाड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या