गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मनपाची स्वच्छता मोहीम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/09/2026 7:20 PM


मिरवणूक मार्गाची आयुक्त संजीता महापात्र यांनी प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना आवाहन

सांगली, दि. १९ सप्टेंबर २०२६ :
सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणपती पंचायतन संस्थानची परंपरागत पाचव्या दिवशीची विसर्जन मिरवणूक तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून विसर्जन मिरवणूक मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

मिरवणूक मार्गावर निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ करण्याच्या कामाची महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाची माहिती घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

 मिरवणूक मार्गावर तातडीने स्वच्छता

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने मिरवणूक मार्गावर विविध प्रकारचा कचरा निर्माण होतो. मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता कर्मचारी, निरीक्षक आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून तातडीने कचरा संकलन व स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे.

आयुक्त संजीता महापात्र यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मिरवणूक मार्गावरील स्वच्छता कामाचा आढावा घेतला.

 उत्सव साजरा करताना स्वच्छतेचीही काळजी घ्या — आयुक्तांचे आवाहन

यावेळी महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. उत्सव साजरा करताना परिसराच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पेपर ब्लास्टचे साहित्य, फटाक्यांचे अवशेष तसेच प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर टाकल्या जातात. यामुळे मिरवणुकीनंतर स्वच्छता करताना महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा संकलित करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे नागरिकांनी पेपर ब्लास्टचे अवशेष, फटाक्यांचे साहित्य, प्लास्टिक पिशव्या किंवा अन्य कचरा रस्त्यावर न टाकता उपलब्ध कचरापेटीत किंवा निर्धारित ठिकाणीच टाकावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.

 “उत्सव भक्तीचा… परिसर स्वच्छतेचाही!”

गणेशोत्सवाचा आनंद घेताना स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या