सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा व कामगार सेल यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी नागरिकांना गाजराचे वाटप करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. तसेच ‘काला धन’, ‘अच्छे दिन’, ‘१५ लाख’ अशी मोदी सरकारची ब्रिजवाक्ये काळ्या फुग्यांवर लिहून आकाशात सोडण्यात आली.
यावेळी बोलताना कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे म्हणाले, “अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले गेले होते; मात्र आजवर एक रुपयाही मिळालेला नाही. काळा पैसा परत आणण्याचेही आश्वासन पोकळ ठरले आहे. या सर्व बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे.”
मा नगरसेवक आरोग्यदूत आयुब भैय्या बारगिर म्हणाले, “अच्छे दिन, काळा धन आणि १५ लाख यांसारखी सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्या सरकारचे लवकरात लवकर विसर्जन व्हावे.”
विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन दादा जगदाळे यांनी सांगितले, “मागील अकरा वर्षांपासून मोदी सरकारने तरुणांना अच्छे दिनचे फक्त गाजर दाखवले आहे. या काळात ठोस अशी कोणतीही कामगिरी झाली नसून, फक्त आश्वासनांचीच पुनरावृत्ती करण्यात आली आहे. त्याविरोधात आम्ही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाजरवाटप करून आंदोलन केले.”
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मा नगरसेवक आयुब भैय्या बारगिर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन दादा जगदाळे, कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने, कार्याध्यक्ष अफजलभाई मुजावर, शहराध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण, राजू कांबळे व राहुल यमगर आदी मान्यवर उपस्थित होते.