महाराष्ट्र व विशेषकरून सांगली जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सहकार तपस्वी, माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे योगदान लक्षवेधी आहे. आज त्यांची १०४ वी जयंती.. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
महाराष्ट्र मोठा करण्यात
महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे योगदान महत्त्वाचे आहे आणि राज्यातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी गुलाबरावांचे परिश्रम लाखमोलाचे ठरले आहेत. कारखाने,पतसंस्था, सूतगिरण्या, दुध संघ,ग्राहक भांडार, विकास सोसायट्या, अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या सहकारी संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अतीअल्पभूधारक, अल्पभूधारक शेतकरी व कष्टकरी माणसाची जीवनशैली उंचावण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून झाले आहे हे मान्य करावेच लागेल. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जडणघडण आणि सहकार तपस्वी खासदार स्व. गुलाबराव पाटील हे समीकरण अतूट आणि अभंग आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या कार्याची नोंद घेतल्याशिवाय सांगली जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राच्या सहकार व ग्रामीण विकासाचा इतिहास पुढे सरकू शकत नाही.
गुलाबरावांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांताच्या बेळगाव जिल्ह्यातील बेनाडी या गावी १६ सप्टेंबर १९२१ रोजी धार्मिक, सुसंस्कृत व खानदानी मराठा पाटील घराण्यात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण बेनाडीतच झाले. १९३८ साली ते कोल्हापूरात मॅट्रिक उत्तीर्ण होऊन,इंग्रजी, अर्थशास्त्र व इतिहास विषयात राजाराम काॅलेजमधून बी.ए.झाले. १९४५ मध्ये ते कायदा पदवीधर झाले. १९४५ ते १९४९ या काळात त्यांनी साताऱ्यात वकिली केली. पुढे स्व. यशवंतराव चव्हाण व स्व.वसंतदादा पाटील यांच्या आग्रहास्तव त्यांनी सांगलीत वकीली सुरू केली.ते गरिबांचा वकील म्हणून प्रसिद्ध होते.
१९४९ मध्ये कोल्हापूरस्थित निंबाळकर घराण्यातील प्रमिलादेवी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आणि सार्वजनिक कामाला प्रोत्साहन व खंबीरपणे त्यांना साथ देणारी माझ्या मातोश्री श्रीमती प्रमिलादेवी पाटील बहुजन समाज माऊली बनली.
बेनाडीने महाराष्ट्राला तीन कर्तबगार पुरुष दिले आहेत. एक - छ. शाहू महाराजांनी क्षात्रजगतगुरु पद बहाल केलेले सदाशिवराव पाटील,दुसरे- मराठी चित्रपट सृष्टीत अमीट ठसा उमटविलेले दिनकर द. पाटील आणि तिसरे माजी खासदार.. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील.
गुलाबराव १९५१ मध्ये सांगलीत आले. वकिली व्यवसायात बऱ्यापैकी पैसा आणि प्रतिष्ठा मिळत होता परंतु या अवलिया समाजपुरुषाला सामाजिक व सहकारी क्षेत्रात काम करण्याची जबरदस्त इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती.
१९५२ साली ते सम्राट व्यायाम मंडळाचे अध्यक्ष झाले. या क्रिडासंस्थेच्या कामातून मन.. मेंदू आणि मनगट बळकट होऊन स्वतःच्या कुटुंबाबरोबर सार्वजनिक कामात झोकून देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे जबरदस्त नेटवर्क त्यांनी तयार केले व १९५४ - ५५ मध्ये ते वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी सांगली नगरीचे नगराध्यक्ष झाले. सांगली शहरासाठी स्वच्छ व मुबलक पेयजल योजना यशस्वी केली.
१९५५-५६ सालात सांगली जिल्ह्याची अर्थवाहिनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत गुलाबराव निवडून आले आणि पहिले उपाध्यक्ष झाले. पुढे १९५६ ते १९७० अशी १४ वर्षे त्यांनी या बँकेचे अध्यक्ष म्हणून बँकेचा चौफेर विकास केला. १९५६ ते १९८६ पर्यंत सलग तीन दशके संचालक म्हणूनही त्यांचा सहकार व बँकींगचा गाढा अभ्यास व अनुभव होता.जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार लोकाभिमुख व पारदर्शक करण्यात त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले आणि त्यांच्या कारकीर्दीत बँकेचे पदाधिकारी व संचालक यांनी त्यांच्या कार्यप्रणालीला उत्कृष्ट साथ दिली म्हणून बँकेने शाखा विस्तार व आर्थिक स्थैर्य प्राप्त केले यामध्ये सहकार तत्त्वानुसार बँक चालवणारे गुलाबराव पाटील यांचे खमके नेतृत्व लोकमान्य झाले.
गुलाबरावानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत हे करुन दाखवलं :-
१)आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून नावलौकिक प्राप्त वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स घेण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस पीक कर्जे दिली आणि कारखाना उभारणीसाठी बेडगकर घोरपडे सरकार, म्हैसाळकर शिंदे सरकार यांच्यासह जिल्हाभर दौरे करुन कारखाना का झाला पाहिजे या विषयावर प्रबोधन करुन भरीव कामगिरी केली आहे.तसेच जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्याचे शेअर्स घेण्यासाठीही सोसायटी सभासदांना मध्यम मुदत कर्जे दिली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक साखर कारखाने उभे राहिले व जिल्हा सुजलाम सुफलाम झाला.
२)जिल्ह्यातील कमकुवत सोसायट्यांना बिनव्याजी भांडवल देऊन त्यांना बळ दिले.
३)बँकेच्या प्रशासकीय कामात शिस्त निर्माण केली. ते पूर्व सूचना न देता शाखांना भेटी घेऊन तपासणी करत त्यामुळे शाखांचे कामकाज स्वच्छ आणि पारदर्शक झाले.
४)कर्मचारी हौसिंग लोन व गुंठेवारी कर्ज योजना सुरु करुन त्यांना स्वतःची घरे उपलब्ध करुन दिली.
५)स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या.
६)बँकेची कर्मवीर भाऊराव पाटील चौकात भव्य मुख्य कार्यालयाची इमारत उभी केली.
७)जिल्ह्य़ात द्राक्ष, डाळिंब इ. फळ पिके वाढावीत यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. शं. ठाकूर यांच्या बरोबर खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन प्रचार व प्रसार केला आणि द्राक्ष व फळबाग पिक कर्ज योजना राबवली. त्यामुळे सांगलीची द्राक्षे, बेदाणा व डाळिंबे जागतिक बाजारपेठेत गेली.
८) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षीय कारकीर्दीत रु. १०००/-पीक कर्जदारांना वेळेत कर्ज फेडल्यास ४%रिबेट देण्याची पद्धत सुरू केली.
९)ग्रामीण भागातील गरीब शेतकरी समस्यामुक्त व्हावा यासाठी विभिन्न व्याजदर योजनेचा पाया राज्यात पहिल्यांदा १९६९-७० मध्ये गुलाबरावांनी घातला होता.सध्या राज्य शासन लहान शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात सूट देण्याची योजना जाहीर करते त्याचा पाया महाराष्ट्रात गुलाबराव पाटलांनी ५३ वर्षापूर्वी घातला आहे.
१०)दुभती जनावरे खरेदीसाठी दिलेली एक वर्षाची मुदत कर्जे एका वर्षात फिटत नाहीत हे त्यांनी रिझर्व्ह बॅंक व राज्य सहकार बँकेस पटवून दिले व पुढे मध्यम मुदत कर्जे हे धोरण राज्याने मान्य केले होते.गुलाबराव हे मध्यम मुदत कर्ज योजनेचे जनक मानले जातात.
११) कृष्णा खोरे दुध उत्पादक संघाच्या स्थापनेला त्यांनी प्रेरणा देऊन सहकार्य केले.
१२)राज्यातील आजारी साखर कारखाने पुनर्वसन समितीचा चेअरमन म्हणून त्यांनी अनेक आजारी साखर कारखान्याचे पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला होता.
१३) दोन वर्षे ते राज्यस्तरीय अकौंट कमिटीचे तज्ञ संचालक होते.
किती गरिबांचे कल्याण केले हे सहकार चळवळीच्या यशाचे गमक व मूल्यमापन कसोटी आहे.. सहकारातून सामान्य गरीब शेतकरी.. कामगार व काॅमन मॅनचे राहणीमान उंचावून माणूस घडला पाहिजे यासाठी ते खपले हे कोणीही नाकारू शकत नाही. दारिद्र्य.. दैन्य.. विषमता व मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार व राजकारण हातात हात घालून पुढे गेले पाहिजे हा त्यांचा शाश्वत विचार प्रेरणादायी आहे. १४)कवठेमहांकाळ,जत,आटपाडी व मिरज तालुक्यातील
दुष्काळी पूर्व भागातील धनगर समाजातील गरीब मेंढपाळांना शेळ्या मेंढ्या खरेदीसाठी कर्ज वाटप केले आणि रिझर्व्ह बँकेकडून या कामी न मिळणारे फेरकर्जवाटप सुरु करवून घेतले.
१५)दुष्काळी भाग व एकूणच बँकेची वाढती थकबाकी याचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ वि.म.दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याचा अहवाल शासनास सादर केला.. थकबाकी कमी करण्यासाठी त्या अहवालात ज्या उपाययोजना सुचविण्यात आल्या त्यांचा अमंल सहकारी बँकींगसाठी शासनाने केल्याचे दिसून येते.
१६)बँक कर्ज व मेंबर कर्ज यामधील तफावत कमी केली.
१७)१९६८-७० या काळात त्यांनी डवरी, गोसावी व गोंधळी या भटक्या जमातीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात हातभार लागावा म्हणून आर्थिक सहाय्याच्या योजना राबविली.
सांगली जिल्हा नियोजन मंडळाचे पहिले सेक्रेटरी म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वागिण विकासाचा परिपूर्ण आराखडा सादर केला.. आज जिल्हा विकासाच्या दृष्टीने त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन म्हणून त्यांनी निराधार व विधवा महिलांना दरमहा पेन्शन सुरू करण्याला शासनास भाग पाडले. आज राज्यातील अनेक अशा निराधार व विधवा महिलांना ही पेन्शन मिळते. बँकेत दरमहा अशा निराधार महिलांची पेन्शन घेतानाची गर्दी बघितली तर हमखास गरिबांप्रती त्यांची संवेदनशीलता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
त्यांनी जिल्हा बँकेत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना नोकऱ्या दिल्या. अधिकारी सेवकांना हक्काची घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग लोन योजना राबवली.
बहुजन समाजातील लेकरांना घडविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीसाठी जिल्हा बँकेकडून एक लाख रुपये देणगी त्यांनी दिली होती. गरिबांची लेकरं शिकावीत ही त्यांची प्रामाणिक तळमळ होती.
सहकार क्षेत्रातील योगदान :-
१९८० ते १९८२ अशी दोन वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे ११ वर्षे अध्यक्ष आणि २९ वर्षे संचालक म्हणून राज्याच्या सहकार चळवळीचे खंबीर व यशस्वी नेतृत्व त्यांनी केले आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक मंडळी व जिल्हा सहकारी बोर्ड संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. १९७२ मध्ये ते राष्ट्रीय सहकारी संघाचे सरचिटणीस होते.सहकार क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी, संचालक व सेवक यांच्यासाठी सहकार प्रशिक्षण केंद्र सुरु करुन स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा पॅटर्न निर्माण केला.
अमेरीका, जपान, इंग्लंड, इस्रायल, कोरिया अफगाणिस्तान, इराण, कुवैत व तुर्कस्तान इ. देशांचा दौरा करुन त्यांनी शेती व सहकाराचा सविस्तर सखोल अभ्यास केला आणि विविध ठिकाणी भाषणातून प्रबोधन केले व 'सहकाराची नवी दिशा' हे पुस्तकही लिहिले.
प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.त्यांच्यामुळे सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र चालू लागला.. बोलू लागला व प्रगतीपथावर आरुढ झाला या मध्ये त्यांचा सिहांचा वाटा आहे. घराघरात समृध्दी नेण्यात त्यांचे कष्ट खूप मोठे आहेत. बाळासाहेब भारदे, वैकुंठभाई मेहता, वसंतदादा पाटील, धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, राजाराम बापू पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, रत्नाप्पाणा कुंभार, तात्यासाहेब कोरे,स्व. डॉ. पतंगराव कदम, आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील, वि. स. पागे, वि.म.दांडेकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.महाराष्ट्र मोठा करण्यासाठी ते या दिग्गज मंडळीबरोबर चर्चा करायचे योजना आखून अंमलबजावणी करायचे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची सहकारी चळवळीतील तपश्चर्या लक्षात घेऊन त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी मिळेल असे पाहिले. १९६६ ते १९७८ अशी सलग १२ वर्षे त्यांनी खासदार म्हणून सभागृहात शेतकरी.. कष्टकरी.. वंचित.. उपेक्षित.. दुष्काळी भागातील जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला.. आर्थिक व सहकारी क्षेत्रातील समस्याना वाचा फोडली.. शेतीमालाला हमीभाव व कर्जमाफी हे विषय पोटतिडकीने मांडले होते.
ते अत्यंत स्वाभिमानी व कामसू वृत्तीचे होते.ते ज्या ज्या संस्थेत काम करत तेथील कर्मचाऱ्यांना आदराने वागवत.. त्यांच्या समस्या ऐकून त्यांना मदत करीत. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेटाने चालवण्यासाठी जिल्हा बँकेच्या सभासदांनी संचालक म्हणून त्यांचे कर्तबगार सुपुत्र.. लोकसेवक पृथ्वीराजबाबा पाटील यांना संधी दिली आहे. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शिवाय ते गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून बहुजन समाज शिक्षणाचे रचनात्मक काम करत गुलाबराव पाटील यांची खरी स्मृती जपलेली आहे. १०४ व्या जयंतीनिमित्त गुलाबरावांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!
प्रा. एन.डी.बिरनाळे,
सांगली
१६ सप्टेंबर, २०२५