अहिल्यानगर, दि. २३ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात सुपा एमआयडीसी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करून उद्योगांना आवश्यक असलेल्या सेवांचे, विशेषतः विद्युत पुरवठ्याचे आतापासूनच सुनियोजित नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
सुपा औद्योगिक वसाहतीमधील जाफा कॉमफीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पार पडली, त्यावेळी डॉ. आशिया बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सुपा एमआयडीसीतील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, वीजपुरवठा, अग्निशमन सेवा केंद्र, ट्रक टर्मिनल व कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, एमआयडीसी परिसरात दोन बस थांबे उभारणे व पावसाळी पाण्याचे प्रभावी नियोजन करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. उद्योजकांना कायदा व सुव्यवस्थेबाबत आश्वस्त करतानाच, कोणताही प्रश्न उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, सहाय्यक कामगार आयुक्त भीसले, सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पारनेरच्या तहसीलदार सौंदाणे यांच्यासह औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी अरविंद पारगावकर, प्रकाश गांधी, हरजीत सिंग वधवा, जयद्रथ खाकाळ, श्री.बोथरा व पियुष भंडारी उपस्थित होते.
*******
#SupaMIDC #IndustrialDevelopment #Ahilyanagar #DrPankajAshia #IndustrialFriendshipCommittee #Infrastructure #BusinessGrowth #MIDC #Parner #EaseOfDoingBusiness #IndustrialSafety #MaharashtraIndustry #SupaNews #DistrictCollector #EconomicGrowth