नांदेड–आदिलाबाद स्थानकांदरम्यान डीआरएम श्री. प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/12/2025 6:18 PM

नांदेड :- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी बुधवार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावर सविस्तर तपासणी दौरा केला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश रेल्वे सुरक्षितता, पायाभूत सुविधा, प्रवासी सुविधा तसेच सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती तपासणे हा होता.

या दौऱ्यात नांदेड ते आदिलाबाद दरम्यान रिअर विंडो इन्स्पेक्शन करून ट्रॅक, सिग्नलिंग व संरचनात्मक बाबींची पाहणी करण्यात आली. तसेच मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट व आदिलाबाद येथील अमृत स्थानकांची तपासणी करण्यात आली. स्थानकांवर सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डीआरएम यांनी दिल्या.

डीआरएम यांनी रेल्वे वळण क्रमांक 16 (3 अंश) किमी 27/5 ते 28/3, हिमायतनगर स्थानकातील पॉईंट क्रमांक 14B, तसेच विद्युत सब स्टेशन (TSS) / हिमायतनगर यांची तपासणी केली. याशिवाय स्टील गर्डर पूल क्रमांक 110 आणि PSC गर्डर पूल क्रमांक 137  या पुलांची संरचनात्मक पाहणी करून सुरक्षिततेबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.

तसेच किनवट येथील ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) डेपोची पाहणी करण्यात आली. लेव्हल क्रोस्सिंग 19 ऐवजी प्रस्तावित रेल्वे भुयारी पूल (RUB) क्रमांक 171A या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यासोबतच रेल्वे क्रोस्सिंग (LC) 23 येथील व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.

आदिलाबाद येथील पिट लाईनची तपासणी करून सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. या तपासणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याबाबत तसेच आवश्यक सुधारणा तातडीने करण्याबाबत सूचना डीआरएम यांनी दिल्या. यासोबतच क्रू लॉबी व रनिंग रूम/आदिलाबाद येथे कर्मचारी सुविधा व देखभाल व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

या तपासणी दौऱ्यात नांदेड विभागातील वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांनी डीआरएम यांच्यासोबत सहभाग घेतला. दौऱ्यादरम्यान रेल्वे सुरक्षितता अधिक सक्षम करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या