आरटी आय न्यूज नेटवर्कर
(विजय जगदाळे)
सातारा दि. : बोगस डॉक्टरच्या उपचारांमुळे रुग्णाचा जीव जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्यावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. या कामाच्या प्रगतीचा आढावा पुढील बैठकीत द्यावा. बोगस डॉक्टर शोध मोहिमेत हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बोगस डॉक्टर शोध मोहिम शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे राबवावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, अंगणवाडी, आश्रम शाळा व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वेळापत्रकानुसार आरोग्य तपासणी करावी. या तपासणीत बालकांना गंभीर आजार आढळल्यास तात्काळ उपचाराखाली आणावे. 102 व 108 रुग्णवाहिकांची सेवा खूप महत्वाची आहे. रुग्णाचा कॉल आल्यानंतर रुग्णवाहिका किती वेळेत पोहचतात, आत्तापर्यंत किती नागरिकांचे जीव वाचले याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत कातकरी समाजाला आयुष्मान भारत कार्ड काढून द्यावे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. तसेच क्षय रोग मुक्त भारत अभियानातही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रभात फेरी, महिला मेळाव्यासह शालेयस्तरावर विविध स्पर्धा घ्याव्यात. तसेच बाजाराच्या ठिकाणी पंधरवड्यासंदर्भात प्रदर्शन व आरोग्य मेळावे घ्यावेत. हा पंधरावडा आरोग्य विभागाने यशस्वी राबवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या