महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उत्कृष्ट रुग्णसेवा;डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उल्लेखनीय कामगिरीचा आदर्श

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/01/2026 8:15 PM

नांदेड  :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथे आयुष्यमान भारत योजना व सलग्नित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांअंतर्गत रुग्णसेवेच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय व आदर्शवत कामगिरी करण्यात आलेली आहे.

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अध्यक्षा व उप-अधिष्ठाता डॉ. शितल राठोड-चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दर्जात लक्षणीय भर घातली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2025 या कालावधीत एकूण 7041 पेक्षा अधिक गरीब, गरजू व सर्वसामान्य रुग्णांना गंभीर व अतिगंभीर आजारांवरील उपचार पूर्णतः विनामूल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांच्या आरोग्यस्थितीत लक्षणीय सुधार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

या कालावधीत योजनेअंतर्गत उपचारांपोटी शासनाकडे एकूण रु. 18 कोटी 85 लक्ष 47 हजार 800/- इतकी विमा रक्कम प्राप्त झाली असून, सदर रक्कमेतून रुग्णांच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या विविध तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत रुग्णालयात विविध आजारांवर अद्ययावत व सक्षम उपचार सुविधा कार्यान्वित असून, सर्व विभागांमार्फत समन्वयाने रुग्णसेवा देण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट तसेच मणक्याच्या गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

*औषधवैद्यकशास्त्र विभाग* प्रमुख डॉ. शितल राठोड-चव्हाण तसेच डॉ. कपिल मोरे, डॉ. उबेदुल्ला खान, डॉ. अंजली देशमुख, डॉ.फारुखी राफे यांच्या मार्गदर्शनाखाली जीबीएस (Guillain-Barré Syndrome), ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक यांसारख्या अतिगंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांना पूर्णतः बरे करून घरी सोडण्यात आले.

*शल्यचिकित्सा शास्त्र* विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर, डॉ. केळकर व डॉ. सुनील बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच पोटाच्या व आतड्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या.

*बालरोगशास्त्र* विभाग प्रमुख डॉ. किशोर राठोड, डॉ. सलीम तांबे, डॉ. अरविंद चव्हाण व डॉ. गजानन सुरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निओ-नेटल बेबी केअर, कमी वजनाची नवजात अर्भके तसेच पीआयसीयू मधील अतिगंभीर बालरुग्णांना योजनेअंतर्गत उपचार देऊन जीवनदान देण्यात आले.

*स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग* प्रमुख डॉ. एस. आर. वाकोडे, डॉ. फसिया व डॉ. शिरीष धुलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशयाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) महिलांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.

*कान-नाक-घसा विभाग* प्रमुख डॉ. आतिश गुजराती व त्यांच्या टीमने एंडोस्कोपी सायनस सर्जरी, थायरॉईड सर्जरी तसेच कानाच्या विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया गरजू रुग्णांवर केल्या.

*बधिरीकरणशास्त्र विभाग*
योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावाड व त्यांची संपूर्ण टीम यांनी रुग्णांना सुरक्षित, शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने भूल देण्याचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले.

*श्वसनरोगशास्त्र* विभाग प्रमुख डॉ. विजय कापसे, डॉ. झागडे व त्यांच्या टीमने रेस्पिरेटरी फेल्युअर असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले.

*नेत्रशल्यचिकित्सा* विभाग प्रमुख डॉ. अतुल राऊत व त्यांच्या टीमने डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिरावफुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पार पाडल्या.

*त्वचा व गुप्तरोगशास्त्र* विभाग प्रमुख डॉ. मनोज हरनाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचेच्या गंभीर आजारांवर तंत्रशुद्ध उपचार करण्यात आले.

*मनोविकारशास्त्र* विभाग प्रमुख डॉ. प्रदीप बोडके व डॉ. उमेश आत्राम यांनी मानसिक आजारग्रस्त रुग्णांना योग्य उपचार पद्धतीद्वारे उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत केली.

*दंत शल्यचिकित्सा विभाग*
दंत शल्यचिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. भावना भगत व त्यांची टीम यांनी केलेल्या दंत शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

रुग्णांच्या तपासण्यांसाठी रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. अमित पंचमहालकर व टीम, शरीर विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. समीर व टीम, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय मोरे व टीम, तसेच जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हुमेरा खान व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.

रुग्णांना आवश्यक असलेली औषधे औषध विभाग प्रमुख डॉ. चंडालिया, डॉ. जे. बी. देशमुख व श्री डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली.

अधिसेविका श्रीमती भगीरथा मुदीराज, सर्व नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर यांनी सातत्यपूर्ण परिश्रम घेऊन या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. योजनेचे सर्व कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे श्री. बिबींसार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी डेटा एन्ट्री ऑपरेटर मार्फत प्रभावीपणे करण्यात आले. 

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप-अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, उप-अधिष्ठाता व अध्यक्षा डॉ. शितल राठोड-चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, वैद्यकीय उप-अधीक्षक डॉ. अजय वराडे व डॉ. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा व नियमित आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आले.

सर्व विभागांच्या प्रशासनाचा सक्रिय सहभाग व सहकार्यामुळे एका वर्षात 7041 रुग्णांना योजनेचा लाभ देणे शक्य झाले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राबविण्यात आलेली ही उत्कृष्ट रुग्णसेवा समाजातील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा अधिकार या रुग्णालयामार्फत सुनिश्चित करण्यात आला आहे.

उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णसेवेसाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने कार्यरत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या