नांदेड :- नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण मतदारसंघातील आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर (शिंदे प्रणित) शिवसेनेच्या उमेदवारांना उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम, नांदेडचा जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संघ फेस्कॉम नांदेडचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.नांदेड दक्षिणचे लढवय्या शिवसेना आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने सहानुभूतीने व आपुलकी तथा जिव्हाळ्याने आवाज उठवणारे, गोरगरिबांचे कैवारी आणि सर्वसामान्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी असल्याचे डॉ. हंसराज वैद्य यांनी नमूद केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या मानधनासह प्रलंबित मागण्या,सामाजिक सुरक्षा, आरोग्यविषयक व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आमदार बोंढारकर यांनी आत्तापर्यंत केलेले प्रयत्न उल्लेखनीय व अतुलनीयच नाही तर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याच विश्वासातून नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये आमदार वोंढारकरांच्या शिवसेनेने( शिंदे प्रणित ) ज्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी फेसकॉम संघटना खंबीरपणे उभी असल्याचे डॉ. वैद्य यांनी जाहीर केले आहे . हा पाठिंबा कसल्याही आमिषाला बळी न पडता किंवा कोणत्याही दबावाखाली नसून, तो पूर्णतः आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर यांच्या कार्यावर आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासातून देण्यात येत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.डॉ. हंसराज वैद्य यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील दक्षिण मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आपल्या प्रभागातील शिवसेना उमेदवारांना सहकुटुंब, मित्र परिवारांनी भरघोस मतदान करून, त्यांना विजयी करावे. हा पाठिंबा म्हणजे केवळ राजकीय भूमिका नसून, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आहे.”या जाहीर पाठिंब्याच्या वेळी संघटनेचे सचिव प्रभाकर कुटूंरकर, कोषाध्यक्ष गिरीष बाऱ्हाळे, महिला अध्यक्ष डॉ. लक्ष्मी पोरणशेट्टीवार, समन्वय समिती अध्यक्ष रामचंद्र कोटलवार, डॉ. पुष्पा कोकीळ, ॲड. एम. झेड. सिद्दिकी, सदस्य माधवराव पवार यांच्यासह उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संघ (फेसकॉम), नांदेडच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला आहे.फेसकॉमच्या या जाहीर भूमिकेमुळे नांदेड दक्षिणातील महानगरपालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेची बाजू अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.