स्वारातीम विद्यापीठ परिसरात एकदिवसीय स्वच्छता शिबीर उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/01/2026 8:57 PM

नांदेड :- युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय, पुणे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात एकदिवसीय स्वच्छता शिबीर उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारुती गायकवाड, कार्यक्रमाधिकारी डॉ. सुहास पाठक व प्रा. अभय वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शिबिराची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते  करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी “स्वच्छता ही केवळ मोहिम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाची सवय बनली पाहिजे. स्वच्छ परिसरातूनच सुदृढ समाज आणि सशक्त राष्ट्राची निर्मिती होते,” असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
या स्वच्छता मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेचे शंभरहून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी, तसेच विद्यापीठातील संविधानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग घेत विद्यापीठ परिसरातील रस्ते, मोकळी मैदाने व ओसाड जागांची स्वच्छता केली. यामध्ये सुमारे १५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.
यावेळी वृक्ष संवर्धनासाठी आळे तयार करणे, रस्त्यांची स्वच्छता तसेच ओसाड जागांचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या या श्रमदानामुळे परिसर स्वच्छ व सुशोभित झाला.
या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या