नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नअंतर्गत शिक्षण घेत
असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४–२५ पासून पदवी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० लागू झाल्याने, जुन्या सीबीसीएस
पॅटर्नमधील रखडलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी २०२६ ही एक अतिरिक्त व अंतिम परीक्षेची
संधी जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९–२० मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए. तसेच बी.व्होक अभ्यासक्रमांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या तीनही नियमित
परीक्षेच्या संधी संपल्यानंतरही एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण स्थिती राहिली आहे,
अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयामार्फत परीक्षा आवेदन पत्र
सादर करणे बंधनकारक असून, नियमित शुल्कासह आवेदनपत्र
सादर करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी, २०२६
ठेवण्यात आली आहे. दि.२१ फेब्रुवारी, २०२६ रोजीचा धनाकर्ष (डी.डी.) काढावा किंवा
एनईएफटी/आरटीजीएस करावे आणि सर्व परीक्षा आवेदन पत्रे दि.२३ फेब्रुवारी, २०२६ रोजी
विद्यापीठात सादर करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आवश्यक लिंक लवकरच उपलब्ध करून
देण्यात येणार असून, त्याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक
प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पदवी अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण
पूर्ण करण्याची शेवटची संधी मिळणार असून, विद्यार्थ्यांनी
व महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतींचे काटेकोर पालन करावे, असे
आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.