वांबोरी घाट खून प्रकरणाचा उलगडा; सख्ख्या भावाची हत्या, पुरावा लपवण्यासाठी वडिलांची मदत...

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 21/02/2026 11:30 AM


अहिल्यानगर : जिल्ह्यातील डोंगरगण परिसरातील वांबोरी घाटात दोन दिवसांपूर्वी गोणीत भरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उलगडा केला असून, मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावानेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांनीही मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
मृताची ओळख किरण शिवाजी कवाने अशी पटली असून, त्याचा भाऊ योगेश शिवाजी कवाने याने गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने वडील शिवाजी शंकर कवाने यांच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून वांबोरी घाटात फेकल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी बाप-लेक दोघांनाही अटक केली आहे.
घरगुती वादातून टोकाचे पाऊल
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत किरण हा दारूच्या नशेत वारंवार आई-वडिलांना मारहाण करत असे. कुटुंबीयांनी त्याला समज देण्याचे तसेच व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत घरात वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात योगेशने त्याचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहावर दोन गोण्या चढवून मधून शिवण घालून तो दरीकाठावर फेकल्याची माहिती तपासात समोर आली. या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची वेगवान कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि चौकशीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधातील हिंसाचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या