नांदेड :- इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 परीक्षार्थ्यांपैकी 43 हजार 949 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.68 इतकी नोंदविण्यात आली.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण वेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 178 केंद्रांवर आजची इयत्ता 10 वीची परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.
परंतु जिल्ह्यातील काही केंद्रांवर परीक्षा कालावधीत परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परिसरात दिसून आल्या आहेत. ही बाब भारतीय न्याय संहिता कलम 163 चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून इयत्ता 12 वी तसेच पुढील सर्व इयत्ता 10 वी व 12 वीच्या पेपरदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात परीक्षेशी संबंध नसलेली व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.
सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी इयत्ता 12 वीच्या परीक्षेदरम्यान दहेली तांडा केंद्रास भेट दिली असता त्यांना काही अनधिकृत व ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती परीक्षा केंद्र परिसरात फिरताना आढळून आल्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्ती त्या शाळेचे कर्मचारी किंवा संस्थेचे प्रतिनिधी असले तरी परीक्षेशी थेट संबंध नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 12 वीचा महत्त्वाचा गणित विषयाचा पेपर असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत.
इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून विद्यार्थ्यां व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.