नांदेड :- अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात कामकाज करणाऱ्या विशेष पथकास लातूरवरून मध्यप्रदेशातील बु-हानपूरकडे एका आयशर वाहनातून चंदनाची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहितीवरून, दिनांक 05.04.2026 रोजी पहाटे, नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाण्याचे हद्दीत, लोहा ते नांदेड रोडवरील सई हॉटेलजवळ पथकाने सदर आयशर वाहनास थांबविले असता, सदर वाहन प्रथमतः रिकामे असल्याचे आढळून आले. मात्र, आयशरचे बॉडीमध्ये ड्रायव्हरचे पाठीमागील साधारणतः तीन फूट जागेत, सहा फूट उंचीचा एक विशिष्ट कप्पा बनवण्यात आला असल्याचे पथकास आढळून आले. सदर वाहनावर चढून, त्यावरील ताडपत्री खोलून सदर कप्प्यात प्रवेश केला असता, यात अनेक गोण्यांमध्ये चंदनाचे लाकूड भरले असल्याचे निदर्शनास आले.
सदर कप्प्यातून चंदनाने भरलेल्या गोण्या बाहेर काढून त्यांचे वजन केले असता, त्यात एकूण 36 लाख रुपये किंमतीचे 1,470 किलो वजनाचे चंदनाचे लाकूड मिळून आले. सदर वाहनात ड्रायव्हर तौफिक चांदपाशा देशमुख रा. चापोली, जिल्हा लातूर व सोबत तुकाराम शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी, चाकूर हे दोघेही उपस्थित होते. त्यांच्याकडून, अधिक माहिती मिळवली असता, सदर चंदनाचे लाकूड हे त्यांना उदगीर, आनंदवाडी, चापोली व केज, जिल्हा बीड येथून रामदास शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी व बाळासाहेब जाधव रा. केज, जिल्हा बीड यांनी वाहनात भरून दिल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी, आयशर वाहनातून वाहून नेण्यात येत असलेले, 36,75,000/- रुपयांचे 1,470 किलो चंदन, एक आयशर वाहन व रोख रक्कम रुपये 11,000/- असा एकूण 51,96,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी 1) तुकाराम शेषेराव बुंदराळे, वय 33 वर्ष, रा. आनंदवाडी ता. चाकूर, जि. लातूर 2) तौफिक चांदपाशा देशमुख, वय 44 वर्ष, रा. चापोली, ता. चाकूर, जि. लातूर 3) रामदास शेषेराव बुंदराळे, रा. आनंदवाडी ता. चाकूर जि. लातूर व 4) बाळासाहेब जाधव, रा. अहिल्यानगर, ता. केज जि. बिड व 5) शंकर तानाजी मानपाडे उर्फ जाधव रा. चाकूर यांच्याविरुद्ध लोहा पोलीस ठाणे येथे गुरनं 124/2026 कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता, कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम, कलम 4 वृक्ष तोड अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्हयाचा तपास पोलीस ठाणे लोहा येथील पोउपनि पांचाळ हे करीत आहेत.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकों / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
खबर' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांकडे पोहोचाविता यावी, या
दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.