आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. - जिल्ह्यात पीएनजीचे जाळे विस्तारले जात असून, सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आणि पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे. पीएनजी जोडणी करिता आवश्यक अर्ज जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच तहसील कार्यालय (पुरवठा विभाग) येथे उपलब्ध आहेत, तरी नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी आपल्या जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा यांनी केले आहे.
सध्यास्थितीमध्ये सुरू असलेल्या जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे वैश्विक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा आल्या आहेत. या ऊर्जा संकटास तोंड देण्याकरिता भारत सरकारने (पीएनजी) पाईपद्वारे गॅस जोडण्यांचा वेगवान विस्तार करण्याबाबत निर्देश दिले आहे. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे कराड तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील मलकापूर व कोयना वसाहत पीएनजीद्वारे ९६०० घरगुती वापरासाठी गॅस जोडण्या करण्यात आलेल्या असून सुमारे १००० पेक्षा जास्त कुटुंबे पाईपलाईन द्वारे येणारा गॅस वापरत आहेत. याशिवाय सातारा शहरात विशेषतः हायवेलगत खेड, खिंडवाडी, धनगरवाडी भागात सुमारे १२,००० मीटर बसविण्याचे सुरू आहे.
पीएनजी हा नैसर्गिक वायू असून स्थानिक आणि सुरक्षित स्त्रोतांशी जोडलेला असल्याने त्याच्या किमती अधिक स्थिर राहण्यास मदत होते, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत नाही. आयात केलेल्या एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक वायूचा वापर वाढवणे हे देशाच्या ऊर्जा सरक्षेच्या दष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
सिलिंडर बुकिंग किंवा संपण्याची भीती नाही; २४ तास गॅस उपलब्ध., गॅस हवेपेक्षा हलका असल्याने गळती झाल्यास आगीचा धोका अत्यंत कमी असतो., जेवढा वापर, तेवढेच बिल. मीटर रीडिंगनुसार बिलिंगची सुविधा हे पीएनजी वापराचे मुख्य फायदे आहेत,
शासनाने राज्यभरात शहर गॅस वितरण नेटवर्क विस्तार करणे तसेच सर्व व्यापारी, औद्योगिक एलपीजी ग्राहकांना एकूण ५०% वाटपातून एलपीजी मिळण्यासाठी पात्र होण्यापूर्वी त्यांच्या शहरातील, जिल्ह्यातील संस्थेकडे पाईपने गॅस वितरणकरिता अर्ज करणे व त्या प्राप्त करण्याच्या सज्जतेची स्थिती प्राप्त करणे बंधनकारक असेल अशा सूचना दिलेल्या आहेत.